रावेर लोकसभा मतदारसंघात शरद पवार आज महायुतीच्या विरोधात डागणार तोफ | Sharad Pawar
Jalgaon Today : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हे आज शुक्रवारी (ता.03) रावेर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ 11.00 वजता चोपडा येथे तसेच दुपारी 04.00 वाजता भुसावळ शहरात आणि रात्री 07.00 वाजता मुक्ताईनगरात जाहीर सभा घेणार आहे. तिन्ही ठिकाणच्या सभांमध्ये ते महायुतीच्या विरोधात काय बोलतात, त्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघात करण बाळासाहेब पाटील-पवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. तसेच रावेर लोकसभा मतदारसंघात श्रीराम दयाराम पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी शरद पवार हे जळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी तीन ठिकाणी सभा घेणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांनाही ते मार्गदर्शन करणार आहेत. मुक्ताईनगरातील सभा आटोपल्यावर ते जळगाव येथे रात्री मुक्कामी थांबणार आहेत. रात्रीच्या मुक्कामात लोकसभा निवडणुकीची रणनिती देखील ते ठरवून देतील, असे सांगण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार शरद पवार यांचे हेलिकॉप्टरने जळगाव विमानतळावर शुक्रवारी सकाळी साधारण 10.00 वाजता आगमन होईल. त्यानंतर प्रचार सभांच्या ठिकाणी ते रवाना होतील. त्यांच्या दौऱ्यानिमित्त जळगाव जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.