राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हातून गेल्यानंतर शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिला धीर
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह हातून गेल्यानंतर शरद पवारांनी आज प्रथमच बारामतीमध्ये जाऊन कार्यकर्त्यांना धीर दिला. पक्ष आणि चिन्ह गेले म्हणून अस्तित्व संपत नाही. मी पाच वेगवेगळ्या चिन्हावर लढलो आहे, असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांना हिंमत देण्याचा प्रयत्न केला. तसेच माझ्या वयाची चिंता करू नका, असा टोला विरोधकांना लगावला.
काही लोक पक्ष सोडून जातात तसे नवीन लोक पक्षात येतात. ही राजकारणाची रीत आहे. पण सध्या महाराष्ट्रात जे सुरु आहे ते योग्य नाही. सामान्य लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे. नवीन चिन्ह पोहोचायला वेळ लागणार नाही. लोकांना विश्वास धीर द्या यश नक्की मिळेल, असे शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. ज्याने पक्ष स्थापन केला त्याचा पक्षच काढून दुसऱ्याला दिला. नुसता पक्षच दिला नाही तर चिन्ह सुद्धा देऊन टाकले. हा निर्णय कायद्याला धरुन आहे असे वाटत नाही. त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचा निकाल नीट लागेल अशी अपेक्षा देखील शरद पवार यांनी व्यक्त केली.