जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी आजपासून आरोग्य शिबीर 

Senior citizens : ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यास राज्य शासनाने नुकतीच मान्यता दिलेली आहे. त्याअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक तालुक्यात 01 ते 07 मार्च 2024 या कालावधीत आरोग्य शिबीर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणावर उपाययोजना करण्यासाठी तसेच मनःस्वास्थ् केंद्राव्दारे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या संदर्भातील आरोग्य विभागाची आढावा बैठक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेवून सूचना केल्या आहेत. शिबिर सप्ताहात ज्येष्ठ नागरिकांसाठी श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इ. संबंधित आवश्यक तपासण्या होणार आहेत. या शिबीर सप्ताहास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभासाठी आवश्यक आधारकार्ड/ मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, स्वयं-घोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे सादर करून जिल्ह्यातील जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांनी आपली नोंदणी करून आरोग्य तपासणी करून घ्यावी, असेही आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button