‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, 2 ऑगस्टला होणार प्रदर्शित
जळगाव टुडे । संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावर आधारीत बरेच मराठी चित्रपट यापूर्वी प्रदर्शित झाले आहेत. मात्र, आता संत मुक्ताबाईंचा स्वतंत्र जीवनपट (Sant Muktai Film) आपल्याला चित्रपटगृहात पाहता येणार आहे. सदरचा चित्रपट येत्या 02 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. त्याचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे, तर निर्मिती ए.ए. फिल्म्सने केली आहे. सहनिर्माता सनी बक्षी हे आहेत.
‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये बालपणीच्या ‘संत मुक्ताई’ आणि ‘संत ज्ञानेश्वर’ यांची निरागस रूपे पाहायला मिळाली आहेत. प्राप्त माहितीनुसार संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत मानस बेडेकर आणि मुक्ताईच्या भूमिकेत ईश्मिता जोशी दिसणार आहेत. विश्वात्मक झालेल्या देवमाणसांची कहाणी…’संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या शिर्षकाखाली हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. संत मुक्ताबाईंच्या जीवनावर आधारीत अलिकडे कोणताच चित्रपट आलेला नाही. त्यामुळे मराठी प्रेक्षकांमध्ये या नव्या चित्रपटाबद्दल मोठी उत्कंठा दिसून येत आहे. या चित्रपटाचा प्रोमो नुकताच समाज माध्यमांवर प्रदर्शित झाला. त्याद्वारे संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताबाई यांच्यातील बालपणापासूनची विलक्षण नात्याची झलक दिसून आली.
संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण 42 अभंग प्रसिद्ध आहेत, त्यात त्यांनी दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानेश्वर याने दरवाज्याची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे. योगी चांगदेवाचा अहंकार देखील लहान मुक्ताबाईंचे अलौकिक ज्ञान बघून गळून गेला होता, असे सांगितले जाते. चांगदेवांनी मुक्ताबाईंना नंतर आपले गुरू सुद्धा मानले होते. संत मुक्ताबाईंनी ज्ञानबोध या ग्रंथाचेही लेखन केले असून, त्यांचे समाधीस्थळ जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात आज देखील अस्तित्वात आहे.