Sanjay Raut : जळगावमध्ये खासदार संजय राऊतांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याविषयी केले ‘हे’ वक्तव्य !
Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांचे आज गुरूवारी जळगाव जिल्ह्यात आगमन झाले. याप्रसंगी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सर्वात आधी भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र बदनाम झाल्याचा आरोप करून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही खासदार श्री.राऊत यांनी केली.
Sanjay Raut : In Jalgaon, MP Sanjay Raut made ‘this’ statement about Minister Girish Mahajan!
बदलापूरमधील दोन चिमुकलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर मंत्री गिरीश महाजन हे तिथे गेले होते. मात्र, बदलापुरच्या जनतेनेच मंत्री महाजनांना काही प्रश्न केले, ज्यांचे उत्तर ते देऊ शकले नाही. जनतेच्या संतापाचा देखील सामना करू शकले नाही. जेव्हा जनतेशी सामना केला जात नाही तेव्हा त्यात विरोधकांचा हात आहे, विरोधकांचे कारस्थान आहे तसेच विरोधक राजकीय पोळी शेकत आहेत, असे आरोप आता सत्ताधारींकडून केले जात आहेत. तुम्ही मंत्री आहात आणि सरकारमध्ये आहात. तुमच्या राज्यात महिलांवर, लहान बालकांवर अत्याचार होत असतील तर तुम्ही नैतिक जबाबदारी स्वीकारून सत्तेचा त्याग केला पाहिजे, अशी टीका सुद्धा खासदार श्री.राऊत यांनी गिरीश महाजनांना उद्देशून केली.
देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच महाराष्ट्र राज्य बदनाम झाले
खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला. फडणवीस आल्यापासून महाराष्ट्र बदनाम झाला आहे. राज्याचे राजकारण विषारी आणि गढूळ झालेले आहे. फडणवीस हे गृहमंत्री झाल्यापासून राज्याच्या पोलिस यंत्रणेची भूमिका देखील संशयास्पद राहिली आहे. पोलिसांवर गुन्हेगारांना सोडण्यासाठी कायम दबाब टाकला जातो. त्यामुळे आम्हाला पोलिसांची सुद्धा दया येते, असेही खासदार संजय राऊत यांनी नमूद केले.