एकनाथ शिंदेंची ही अखेरची निवडणूक; राज्यात अजित पवार- शिंदे गटाची एकही जागा येणार नाही !
खासदार संजय राऊतांचे खळबळजनक भाकीत
जळगाव टुडे । ”अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी कितीही पैशाच्या थैल्या वाटल्या, दहशत माजवली आणि गुंडगिरी केली तरी तरी त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव निश्चित आहे. राज्यात हे दोन्ही गट एकही जागा जिंकणार नाहीत. नरेंद्र मोदी महाराष्ट्रात ठाण मांडून बसले आहेत. अमित शहा देखील येऊन जाऊन महाराष्ट्रातच आहेत. अजित पवारांच्या उमेदवारांच्या निवडणुका संपल्या आहेत तर मुख्यमंत्र्यांची धावपळ ही अखेरची फडफड आहे”, असे खळबळजनक भाकीत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महायुतीवर हल्ला करताना व्यक्त केले आहे.
प्रसार माध्यमांशी बोलतांना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. तसेच पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सततच्या महाराष्ट्र दौऱ्यांवरून राऊतांनी हल्ला चढवला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे तन- मन- धनाने एकत्र येऊन काम करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी लोकसभेच्या किमान 35 जागा जिंकणार असल्याचा दावा देखील खासदार राऊत यांनी केला आहे.
”डॅमेज कंट्रोल करण्यासाठी स्वतःचे असे काहीतरी लागते. एकनाथ शिंदेंकडे स्वतःचे असे काहीच नाही. मोदी आणि शहा यांच्या मदतीने चोरलेल्या शिवसेनेच्या मागे जनतेने का उभे राहावे?” असेही संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. याशिवाय देवेंद्र फडणवीस यांना जास्त गांभीर्याने घेऊ नका, ते राजकारणातले एकदम कच्चे मडके आहे, अशी टीका देखील राऊत यांनी केली आहे.