सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्याने स्वतःच्या हाताने संपविले आयुष्य
Jalgaon Today : अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर 15 दिवसांपूर्वी गोळीबार करणाऱ्या काही संशयितांना पोलिसांनी पकडले होते. त्यापैकी एकाने आज बुधवारी चादरीच्या सहाय्याने गळफास घेऊन तुरुंगात आत्महत्या केली. रूग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. अनुज थापन असे मृताचे नाव आहे.
मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार केल्याच्या आरोपावरून अनुज थापन आणि सोनू चंदर या दोघांना काही दिवसांपूर्वी अटक केली होती. पैकी अनुज थपन याला पोलिसांनी पंजाबमधून अटक केली होती आणि सध्या तो तुरूंगात होता. तिथेच त्याने चादरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे तुरूंगातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्याला तातडीने पुढील उपचारासाठी जीटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी उपचार घेत असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.
सलमानच्या घराबाहेरील गोळीबाराच्या घटनेनंतर कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने फेसबुक पोस्टद्वारे सदर हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती. त्यामुळे पोलिसांकडून त्याच्या नावाची देखील या प्रकरणात आरोपी म्हणून नोंद करण्यात आली होती. सागर पाल व विकी गुप्ता या दोघांनी हा हल्ला केला. यापैकी विकी गुप्ता हा दुचाकी चालवत होता, तर सागर पालने प्रत्यक्ष गोळीबार केला. हे दोघेही बिहारचे आहेत. त्यांना शस्त्र पुरविल्याचा आरोप अनुज थापन याच्यावर होता.