ऑनलाइन ऑर्डर केलेला वाढदिवसाचा केक खाल्ल्याने 10 वर्षाच्या मुलीचा मृत्यू
Sad News : आजकाल बाहेरून ऑनलाइन ऑर्डर करून मागविलेले खाद्य पदार्थ खाण्याचा ट्रेंड सगळीकडेच वाढला आहे. मात्र, त्यामुळे कोणाचा जीव देखील जाऊ शकतो याची कोणी कल्पना सुद्धा करणार नाही. प्रत्यक्षात पंजाब राज्यातील पतियाळामध्ये ऑनलाइन ऑर्डर केलेला वाढदिवसाचा केक खाल्ल्याने 10 वर्षीय मानवी नावाच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तिच्या कुटुंबातील अन्य चार व्यक्ती कसेतरी वाचले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अदालत बाजारातील केक विक्रेत्याच्या विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मानवीच्या वाढदिवसानिमित्त एका ऑनलाइन कंपनीकडून केक मागविला होता. साडेसहाच्या सुमारास केक घरी पोहोचला आणि 7.15 वाजता केक कापण्यात आला. केक खाल्ल्यानंतर मानवी आणि कुटुंबियांची प्रकृती अचानक खालावली. सगळ्यांना उलट्यांचा प्रचंड त्रास होऊ लागला. दरम्यान, मानवीची तब्बत जास्तच बिघडल्याने तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, दुसऱ्याच दिवशी तिची प्राणज्योत मालवली. कौटुंबिक समस्यांमुळे मानवी तिच्या आई आणि लहान बहिणीसोबत तिच्या आजोळी राहत होती. मानवीच्या मृत्युप्रकरणी पोलिस आरोग्य विभागाची मदत घेणार असून, आरोग्य विभागाचे पथक लवकरच संबंधित दुकानात जाऊन केकचे नमुने घेणार आहे.
मानवीच्या वडिलांनी पंजाब सरकारला संबंधित दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून यापुढे कोणत्याही कुटुंबाला पुन्हा अशा समस्यांना सामोरे जावे लागू नये आणि कोणी आपला जीव गमावू नये. त्यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे देखील न्यायाची मागणी केली आहे.