जामनेर येथील अंगरक्षकाच्या आत्महत्येला क्रिक्रेटपटू सचिन तेंडुलकर देखील जबाबदार ?
जळगाव टुडे । क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा अंगरक्षक प्रकाश गोविंदा कापडे (वय 38, रा.जामनेर, जि.जळगाव) याने शासकीय पिस्तुलातून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता.15) घडली होती. दरम्यान, ऑनलाइन रमीच्या व्यसनातून जवान कापडे यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक कारण पोलिस तपासातून समोर आलेले असले तरी त्याच्या आत्महत्येला सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हा देखील तितकाच जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.
‘सीआरपीएफ’मध्ये जवान असलेला प्रकाश कापडे हा पत्नी व दोन मुलांसह जामनेर येथील घरी आला होता. परंतु, मला अर्जंट ड्यूटीवर जायचे आहे तुम्ही नंतर या, असे पत्नीला सांगून त्याने अचानक मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, पत्नी व आईने सकाळी जाण्याची विनंती केली. त्यानुसार तो घरापासून काही अंतर जाऊन पुन्हा परत आला आणि घराच्या छतावर जात असतानाच जिन्यात शासकीय पिस्तूलने डोक्यात गोळी झाडून घेतली. दरम्यान, “जवान प्रकाश कापडे याच्या आत्महत्येला क्रिक्रेटपटू सचिन तेंडुलकर देखील तितकेच कारणीभूत आहेत,” असा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी आता केला आहे.
“जो अंगरक्षक सचिन तेंडुलकरचा जीव वाचविण्याचे काम करत होता, त्याच अंगरक्षकाला सचिन करत असलेल्या ऑनलाइन रमीच्या जाहिरातीमुळे जीव गमवावा लागला आहे. अंगरक्षकाला आत्महत्या करायची वेळ आली असेल तर सचिन तेंडुलकरने त्याची सर्व जबाबदारी उचलली पाहीजे. ज्याला भारतरत्न म्हणून आपण गौरविले, त्याच्या जाहिरातीमुळे अशी कोणाला आत्महत्या करावी लागत असेल तर हे दुर्दैव आहे,” असे देखील बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
अन्यथा सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर त्यांचाच पुतळा जाळणार…
“ऑनलाइन गेममुळे तेंडुलकर यांच्या अंगरक्षकानं आत्महत्या केली, हे निषेधार्थ आणि संताप आणणारs आहे. तेंडुलकर यांनी ऑनलाइन रमीची जाहीरात बंद करावी किंवा भारतरत्न पुरस्कार सोडावा. नाही तर येत्या सहा जून रोजी शिवराज्यभिषेक दिनाच्या दिवशी सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर त्यांचा पुतळा जाळून आपण आंदोलन करू,” असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिला आहे.