महासंस्कृती महोत्सवात सैराट फेम रिंकू राजगुरूने जिंकली जळगावकरांची मने

Rinku Rajguru : शहरातील महासंस्कृती महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु उर्फ आर्ची हिने हजेरी लावली आणि जळगावकरांची मने जिंकली. “माझ्या आई वडिलांनी मला शिकताना अभ्यास करायला सांगितले पण एवढीच टक्केवारी मिळव किंवा तुला हेच व्हावे लागेल हे माझ्यावर लादले नाही. म्हणून मी माझी कला जोपासू शकले”, या तिच्या वाक्यावर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

खानदेश ही कलाकारांची व संताची भूमी आहे. या भूमीतील लोककलेचे जतन व संवर्धन करण्यासाठी आपण लोक कलाकारांनी नव्या पिढीला या दुर्मिळ होत चाललेल्या कलांची ओळख करून दिली. आपल्या समृद्ध कला व परंपराचे जतन करण्यासाठीच हा महासंस्कृती महोत्सव आयोजित केल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. महासंस्कृती महोत्सवाच्या शेवटच्या समारोप दिनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकाश लोखंडे, सिने अभिनेत्री रिंकू राजगुरु मंचावर उपस्थित होते.

या महोत्सवात भुसावळचे बुरगुंडा भारूड, करपावली, एकालग्न येथील शिवकालीन भाषा, शाहिरी परंपरा, पहाडी आवाजतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडे, तसेच शिवकालीन शस्त्रे, आरामार याचे दुर्मिळ प्रदर्शन या ठिकाणी भरविण्यात आले. याबरोबर आमच्या भगिनींच्या कष्टानी निर्माण झालेल्या बचत गटाच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तूचे स्टॉल, खानदेशच्या खाद्य संस्कृतीची ओळख देणारे स्टॉल उभारले गेले. त्यातून त्यांची आर्थिक उलाढाल झाली. हे बळ त्यांना आर्थिक स्थिरता मिळवून देण्यासाठी मदतीचे ठरेल. त्यामुळे असे महोत्सव दर वर्षी घेण्याचा आमचा मानस असल्याचेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.

महोत्सवात तीन बचत गटांचा गौरव
महासंस्कृती महोत्सवातील पाचही दिवस मुक्ताई सरस प्रदर्शनाला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यातील गायत्री बचत गट (पळसखेडे), जय जिजाऊ बचत गट (शिरोड) आणि वडनगरी येथील बचत गटाच्या महिलांचा प्रतिनिधीक गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अपूर्वा वाणी यांनी महासंस्कृती महोत्सवाचे पाचही दिवस सूत्रसंचालन केले. आज तिच्या जोडीला रिंकू राजगुरूला बोलतं करण्यासाठी आरजे शिवानी होती.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button