शिरसोलीचे रेशन कार्डधारक स्वस्त धान्यापासून वंचित, तहसिलदारांकडून टाळाटाळ
Ration Card : शासनाकडून कमी उत्पन्न गटातील शिधापत्रिकाधारकांना सध्या गव्हासह तांदळासारखे धान्य रेशन दुकानांवर मोफत दिले जात आहे. याशिवाय सण उत्सवांचे औचित्य साधून आनंदाचा शिधा वाटप होत आहे. दुर्दैवाने शिरसोली (ता. जि.जळगाव) येथील बहुसंख्य शिधापत्रिकाधारकांना गरजू असतानाही कोणताच लाभ अद्याप मिळू शकलेला नाही. तहसील कार्यालयाकडे अनेकवेळा अर्ज करूनही त्यांची कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही.
शिरसोली येथील सुमारे 61 शिधापत्रिकाधारकांना आरसी क्रमांक देऊन स्वस्त धान्य सुरू करण्यासाठी गिरीश श्रीकृष्ण वराडे यांनी जळगावच्या तहसिलदारांकडे आतापर्यंत पाचवेळा अर्ज केले आहेत. प्रत्यक्षात संबंधित कार्यालयाने पोकळ आश्वासने देण्याच्या पलिकडे कोणतीच कार्यवाही केलेली नाही. साधारणपणे जून 2023 पासून गिरीश वराडे हे जळगाव तहसील कार्यालयात शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी पाठपुरावा करीत आहेत. परंतु, आतापर्यंतच्या कोणत्याच तहसिलदारांनी त्यांच्या निवेदनाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे त्यांना सदर कार्यालयाच्या वारंवार चकरा माराव्या लागल्या आहेत. दरम्यान, येत्या आठ दिवसात शिरसोलीतील गरजू ग्रामस्थांना स्वस्त धान्य योजनेचा लाभ न मिळाल्यास जळगावच्या तहसील कार्यालयासमोरच आमरण उपोषणास बसण्याचा इशारा गिरीश वराडे यांनी दिला आहे. भाजपचे जिल्हा चिटणीस मनोहर पाटील, तालुका सरचिटणीस सचिन पवार, तालुका उपाध्यक्ष रामचंद्र पाटील तसेच बापू मराठे, भरत ठाकरे, अशोक पाटील, नितीन पाटील, प्रवीण बारी, सचिन पाटील, रघुनाथ चव्हाण, फकीरा कोलते यांच्याही निवेदनावर सह्या आहेत.