“रोज म्हणत आहेत खोके-खोके, त्यांचे सरकले आहे डोके !”
Jalgaon Today : शीघ्रकवी रामदास आठवले हे त्यांच्या खास कवितांसाठी प्रसिद्ध असून, संधी मिळेल तेव्हा वेळ आणि काळाचे भान न ठेवता खुमासदार कविता ते सादर करताना दिसून येतात. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतही त्यांच्या कवितांनी उपस्थितांची चांगलीच करमणूक होताना दिसत आहे. पेण मतदारसंघात सुनील तटकरेंच्या प्रचार सभेत तर त्यांनी ‘रोज म्हणत आहेत खोके-खोके, त्यांचे सरकले आहे डोके’, अशी कविता सादर करून थेट खसदार संजय राऊतांवर टीका केली. (Ramdas Athavale)
केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे एरवी ट्वीटच्या माध्यमातून काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर कायम निशाणा साधताना दिसतात. लोकसभा निवडणुकीच्या काळातील त्यांच्या कविता चांगल्याच चर्चेचा विषय बनल्या आहेत. परवा नरेंद्र मोदी घुम रहे है बनकर भारत का आत्मा, 4 जून को काँग्रेस और इंडी आघाडी का करदेगी जनता खात्मा ! असे ट्विट करत आठवलेंनी धम्माल उडवून दिली. त्याचीही सोशल मीडियाच चांगलीच चर्चा रंगताना दिसली.आठवलेंचा कविता स्टाईलने फटकेबाजी करण्याचा स्वभाव अनेकांना माहित आहे. त्यामुळे त्याचे कोणी वाईट देखील वाटून घेत नाही. त्यानुसार त्यांनी पेण मतदारसंघातील आपल्या सभेत खासदार संजय राऊत यांनाही सोडले नाही. राऊत भलेही उठसूठ पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करत असतील. पण त्यांनाही रामदास आठवल्यांच्या रूपाने शेरास शेर भेटला.
दरम्यान, लोकसभा निवडणुकांसाठी आम्हाला एकतरी जागा मिळावी अशी अपेक्षा होती. महायुतीच्या नेत्यांनी प्रयत्न केले असते तर नक्की मिळाली असती. जागा मिळाली नसली तरी मी महायुतीसोबत आहे, मला तिकीट दिले नाही तरी देखील मी भाजपसोबतच आहे, मी सध्या राज्यसभेवर असून 2026 पर्यंत खासदार आहे. त्यानंतर देखील मला राज्यसभा मिळेल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे.