Rakshabandhan : अजितदादा-सुप्रिया सुळेंच्या रक्षाबंधनाकडे महाराष्ट्राचे लक्ष; सुप्रियाताईंनी स्पष्टच सांगितले…!
Rakshabandhan : लोकसभेच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघात बहिणीच्या विरोधात पत्नीला उमेदवारी देऊन अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्या विरोधात मोठा पंगा घेतला होता. त्यामुळे दोन्ही कुटुंबात मोठे वितुष्ठ देखील निर्माण झाले होते. यथावकाश राजकीय वादळ शमल्यानंतर येत्या १९ तारखेला साजऱ्या होणाऱ्या रक्षाबंधनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सुप्रियाताई आपल्या भावाला म्हणजेच अजित पवार यांना राखी बांधणार किंवा नाही, त्याविषयी अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत.
Rakshabandhan : Maharashtra’s focus on Ajitdada-Supriya Sule’s Rakshabandhan; Supriyatai clearly said…!
लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली होती. यामुळे पवार कुटुंबात उभी फूट पडल्याची चर्चा सुद्धा होती. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे रक्षाबंधनाचे फोटो गेल्या वर्षी समोर आले नव्हते. यंदा तरी रक्षाबंधनला अजित पवार व सुप्रिया सुळे हे एकमेकांना भेटतील की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेमके काय म्हणाले अजित पवार ?
येत्या रक्षाबंधनाला सुप्रियाताईंकडून राखी बांधून घेणार आहात का, असा प्रश्न अजित पवार यांना प्रसार माध्यमांनी केला. तेव्हा ‘सध्या माझे महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत. त्या दौऱ्यात मी ज्या शहरात असेल तेथील बहिणींना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे. तिथे जर सुप्रिया असेल तर तिलाही भेटणार आहे’, असे अजित पवार म्हणाले. म्हणजे अजित पवार यांच्या बोलण्यावरून त्यांच्या दृष्टीने रक्षाबंधनापेक्षा महाराष्ट्रातील दौरे जास्त महत्वाचे असल्याचे स्पष्ट झाले.
सुप्रियाताई म्हणाल्या ‘आधी लग्न कोंढाण्याचे’
दरम्यान येत्या रक्षाबंधनाला तुम्ही अजितदादा पवार यांना राखी बांधणार आहात का, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनाही प्रसार माध्यमांनी विचारला. तेव्हा ‘रक्षाबंधनाच्या दिवशी मी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. आधी लग्न कोंढाण्याचे… माझा कार्यक्रम ठरला आहे. अजितदादा कुठे आहेत मला माहिती नाही. त्यांना राखी बांधणार की नाही हे तुम्हाला लवकरच कळेल’, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.