Rakshabandhan : अनोखे रक्षाबंधन; ९० वर्षांच्या लाडक्या बहिणीने ८४ वर्षांच्या शरद पवारांना बांधली राखी…!
Rakshabandhan : रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा हा बहिण-भावाच्या अतुट नात्याचा सण. बहीण दिर्घायुष्यासाठी भावाच्या हातावर राखी बांधते आणि आयुष्यभर आपले रक्षण करण्याचे वचन त्याच्याकडून घेते. दरम्यान, दरवर्षी श्रावण महिन्यात येणाऱ्या रक्षाबंधनाला अजून काही दिवस बाकी असताना, तत्पूर्वीच सोलापूर जिल्ह्यात ९० वर्षांच्या लाडक्या बहिणीने ८४ वर्षांच्या शरद पवारांना राखी बांधली आहे. ज्याची सध्या सगळीकडे चर्चा देखील आहे.
Unique Raksha Bandhan; 90-year-old beloved sister tied rakhi to 84-year-old Sharad Pawar…!
बार्शीच्या माजी आमदार प्रा. झाडबुके सध्या सक्रिय राजकारणात नाहीत. परंतु त्यांचा शरद पवार यांच्याशी असलेला जिव्हाळा आजही कायम आहे. त्याच जाणिवेतून राखी पौर्णिमेला अजून आठवडाभर अवकाश असताना प्रा. झाडबुके यांनी थरथरल्या हातांनी शरद पवार यांना राखी बांधून त्यांचे औक्षण केले. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावल्याशिवाय राहिले नाही. बार्शी येथे शरद पवार शेतकरी संवाद मेळाव्याच्या निमित्ताने आले होते. दौरा संपल्यानंतर त्यांनी त्यांच्या जुन्या सहकारी आणि निष्ठावान समर्थक, माजी आमदार प्रा. प्रभाताई झाडबुके यांच्या घरी जाऊन त्यांची आस्थेवाईक विचारपूस केली. प्रा. झाडबुके यांचे वय सध्या ९० वर्षे आहे. ८४ वर्षांच्या शरद पवारांना प्रा. झाडबुके यांनी राखी बांधून त्यांचे हृद्य औक्षण केले. शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक अद्वितीय स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या राजकीय प्रवासात अनेक सहकारी, सहप्रवासी आणि समर्थक यांनी त्यांना साथ दिली आहे. अशाच त्यांच्या दीर्घकाळाच्या सहकारी प्रा. प्रभाताई झाडबुके यांच्याबद्दलची त्यांच्या मनातील आस्था आणि स्नेहाचे प्रदर्शन बार्शी येथे घडलेल्या एका प्रसंगातून समोर आले.
शरद पवारांनी केला निष्ठेचा आणि त्यागाचा सन्मान
प्रा.प्रभाताई झाडबुके या शरद पवार यांच्या ५५ वर्षांपासूनच्या एकनिष्ठ सहकारी आहेत. १९६२ आणि १९६७ अशा सलग दोनवेळा त्या बार्शी विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. उत्कृष्ट वक्त्या आणि सशक्त नेतृत्वाच्या गुणांनी त्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक विशिष्ट ओळख निर्माण करू शकल्या. शरद पवार यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यावरही प्रा. झाडबुके त्यांच्यासोबत निष्ठेने उभ्या राहिल्या. प्रा.झाडबुके यांची आणि शरद पवारांची ही दीर्घकालीन निष्ठा आणि सहकार्याचे नाते भारतीय राजकारणात एक आदर्श उदाहरण म्हणून पाहिले जाते. पवारांनी आपल्या जुन्या सहकारी प्रा. झाडबुके यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करणे हे केवळ औपचारिक भेट नव्हे, तर त्यांच्या निष्ठेचा आणि त्यागाचा सन्मान होता.