रक्षा खडसे यांना नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मिळाले ‘हे’ महत्वाचे खाते !
जळगाव टुडे | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमधील सर्व मंत्र्यांनी रविवारी (ता.09) राजभवनात शपथ घेतली होती. त्यानंतर आज सोमवारी संबंधित सर्व मंत्र्यांना त्यांचे खाते वाटप करण्यात आले. त्यानुसार अमित शहा तसेच नितीन गडकरी यांच्याकडील गेल्या वेळची खाती कायम ठेवण्यात आली आहेत, तर राजनाथ सिंह आता देशाचे संरक्षण मंत्री असतील. शिवराज सिंह यांच्याकडे कृषी मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. (Raksha Khadse)
दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीत रावेर मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या भाजपच्या खासदार श्रीमती रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनीही रविवारी केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. आज सोमवारी (ता.10) झालेल्या खाते वाटपात त्यांच्या वाट्याला युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारी आली.
महाराष्ट्रातून मंत्रिपद मिळालेल्या खासदारांपैकी पीयूष गोयल यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय देण्यात आले आहे. प्रतापराव जाधव यांना आयुष तसेच स्वास्थ्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचा स्वतंत्र पदभार सोपविला आहे. रामदास आठवले यांच्याकडे पुन्हा सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाचे राज्यमंत्री पद सोपविण्यात आले आहे. मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री पद आले आहे.