रक्षा खडसेंकडे मोदींच्या नवीन मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री पदाची जबाबदारी ?
जळगाव टुडे | लोकसभेच्या निवडणुकीत रावेर मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या भाजपच्या खासदार श्रीमती रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी रविवारी केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत शपथ घेतलेल्या महाराष्ट्रातील मोजक्या सहा खासदारांमध्ये रक्षा खडसे यांचाही समावेश होता. विशेष म्हणजे रक्षा खडसे ह्या केंद्रात मंत्रिपद भूषविणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार ठरल्या आहेत. आता त्यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी येते, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारमध्ये महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ आणि रामदास आठवले यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रात आगामी काळात विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सहा मंत्र्यांवर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. गेल्या वेळी महायुतीचे 41 खासदार निवडून गेल्यानंतरही राज्याच्या वाट्यावर केंद्रातील फक्त आठ मंत्रिपदे आली होती. तर यंदा लोकसभेच्या जेमतेम 17 जागा जिंकल्यानंतरही राज्याला तब्बल सहा मंत्रिपदे मिळाली आहेत.
रक्षा खडसे यांच्या रूपाने धुळ्याचे तत्कालिन खासदार डॉ.सुभाष भामरे तसेच दिंडोरीच्या तत्कालिन खासदार डॉ.भारती पवार यांच्यानंतर खान्देश व उत्तर महाराष्ट्राला दुसऱ्यांदा केंद्रात मंत्रिपद मिळाले आहे. पैकी डॉ.भामरे यांच्याकडे संरक्षण राज्यमंत्री पदाची जबाबदारी होती, तर डॉ.पवार यांच्याकडे स्वास्थ्य व परिवार कल्याण राज्यमंत्री पदाची जबाबदारी होती. आता रक्षा खडसेंकडे कोणती जबाबदारी दिली जाते, त्याकडे साहजिकच संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. प्राप्त माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तसेच वरणगाव येथे संरक्षण खात्याचे आयुध निर्मिती कारखाने आहेत. दोन्ही कारखाने रावेर मतदारसंघातच असल्याने अर्थातच त्यांच्याशी संबंधित बरेच प्रश्न खासदार रक्षा खडसे यांनी यापूर्वी लोकसभेत मांडले आहेत. त्या विषयावरील चर्चेतही भाग घेतला आहे. संरक्षण विषयात असलेला त्यांचा चांगला अभ्यास लक्षात घेता त्यांना केंद्रात त्यामुळे कदाचित संरक्षण राज्यमंत्री पदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.