खासदार रक्षा खडसेंचा ‘तो’ जुना व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल !

जळगाव टुडे । सन २०१९ मधील एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये नाशिक मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार ह्या लोकसभेत मराठीमध्ये राज्यातील दुष्काळ परिस्थितीसंदर्भात भाषण करत आहेत आणि मागील बाकावर बसलेल्या भाजपाच्या खासदार प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे ( Raksha Khadse) यांना हसू आवरत नसल्याचे दिसून येत आहे. आताच्या लोकसभा निवडणुकीचे औचित्य साधून कोणीतरी तो पाच वर्षांपूर्वीचा व्हिडीओ पुन्हा व्हायरल केला आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टीने खासदार रक्षा खडसे यांना यावेळी तिसऱ्यांदा उमेदवारी दिली असून, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने उद्योजक श्रीराम पाटील यांना मैदानात उतरविले आहे. दरम्यान, रावेर मतदारसंघाचा आतापर्यंत झालेला विकास अधोरेखित करून तो जनतेच्या समोर आणण्याचे काम महायुतीने प्रचारादरम्यान केले आहे. तर महाविकास आघाडीने मतदारसंघातील समस्या, शेतकऱ्यांच्या अडचणी, महामार्गासह रेल्वेचे प्रश्न, रखडलेला महाकाय पुनर्भरण प्रकल्प आदी बऱ्याच विषयांवर मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या चार सभा घेऊन मतदारसंघात वातावरण निर्मिती करण्यावर भर दिलेला आहे.

दरम्यान, सोशल मीडीयावर पाच वर्षांपूर्वींचा एक जुना व्हिडीओ कोणीतरी मुद्दाम खोडसाळपणा करून लोकसभा निवडणुकीत व्हायरल केल्याचे दिसून आले आहे, ज्यामध्ये खासदार रक्षा खडसे यांना संसदेमधील चर्चेच्या वेळी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासोबत हसू आवरत नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्याच व्हिडीओचा आधार घेऊन ज्यांना संसदेचे गांभीर्य नाही त्यांना तुम्ही यावेळी पुन्हा निवडून देणार का, असाही सवाल त्या सोशल मिडिया पोस्टच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला आहे. ज्याची सध्या सगळीकडे चर्चा देखील आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button