Raksha Khadse : जळगावहून तिरूपती, इंदौर, अहमदाबादला विमानसेवा सुरू करा; रक्षा खडसेंचे नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना निवेदन !
Raksha Khadse : जळगावहून गोवा, हैदराबाद, पुणे तसेच मुंबईसाठी नियमित विमानसेवा काही दिवसांपासून सुरू असून, त्यास प्रवाशांचा चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. दरम्यान, जळगावहून तिरुपती, इंदौर व अहमदाबादला देखील विमानसेवा चालू करण्यात यावी, असे निवेदन केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजरापू यांची भेट घेऊन दिले आहे. तसेच मुंबई व पुणे विमानसेवेची वेळ प्रवाशांच्या सोयीनुसार सकाळ व संध्याकाळ करावी,अशीही मागणी श्रीमती खडसे यांनी केली आहे.
Raksha Khadse : Start flights from Jalgaon to Tirupati, Indore, Ahmedabad; Raksha Khadse’s statement to the Minister of Civil Aviation!
जळगावहून सध्या असलेली विमानसेवा व नव्याने सुरू करण्याची गरज असलेल्या विमानसेवेच्या संदर्भात नवी दिल्ली येथे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांची भेट घेऊन मंत्री रक्षा खडसे यांनी चर्चा केली. जळगाव विमानतळावरून लवकरात लवकर “तिरुपती, इंदौर व अहमदाबाद”साठी विमानसेवा चालू करणेबाबत मागणी केली. तसेच सध्या पुणे व मुंबईसाठी सुरू असलेल्या विमानांच्या उड्डाणांची वेळ प्रवाशांसाठी सोयीची ठरेल, अशी ठेवण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजरापू यांनी सकारात्मक निर्णय घेऊन दोन्ही मागण्यांवर तातडीने कार्यवाही करणेबाबत आश्वासन दिले.
पुणेसाठी संध्याकाळी, मुंबईसाठी सकाळी दररोज विमानसेवा सुरू करा…
जळगाव विमानतळावर आयएफआर-ऑल वेदर ऑपरेशन, लॉ व्हिजीबिलिटी व नाईट लँण्डींग अशा स्थानिक विमान वाहतुकीसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध आहेत. जळगाव विमानतळावरून सद्यःस्थितीत मुंबई व पुणेसाठी आठवड्यातून काही दिवसच विमानसेवा सुरु आहे. परंतु, जळगाव येथून प्रवास करणारे व्यापारी व नागरिकांच्या मागणीनुसार त्यांच्या सोयीसाठी तसेच परिसरातील अधिकचे प्रवासी आकर्षित करण्यासाठी पुणेसाठी संध्याकाळी व मुंबईसाठी सकाळी दररोज विमानसेवा सुरू करण्यात यावी, अशीही मागणी मंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.