रक्षा खडसेंनी नाराज चंद्रकांत पाटलांच्या मनधरणीसाठी साधला आखाजीचा मुहुर्त !

जळगाव टुडे । मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील हे नाराज असल्याने महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या प्रचारापासून इतके दिवस लांबच होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपच्या नेत्यांसह जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही प्रयत्न करून पाहिले. अखेर आज आखाजीचा मुहुर्त साधत स्वतः रक्षा खडसे ह्या चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. तिथे गेल्यानंतर त्यांनी आमदार पाटील यांची मनधरणी देखील केली. आता ते पुढे काय भूमिका घेतात त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली तेव्हा भाजपचे रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकुमार महाजन तसेच शिंदे सेनेचे पदाधिकारी छोटू भोई, अफसर खान आदी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. शेवटच्या दोन दिवसात तरी आमदार पाटील हे महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारात सक्रीय होतील, अशी आशा महायुतीच्या नेत्यांना वाटते आहे.

दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील यांनी खरोखर मनावर घेऊन प्रचार केला तरच रावेर मतदारसंघात शिंदे सेनेची मते रक्षा खडसे यांच्या पारड्यात पडू शकणार आहेत. त्यासाठीच भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील हे इतक्या दिवसांपासून प्रयत्न करत होते. शेवटी दोघांचे मनोमिलन झाल्याने महायुतीच्या नेत्यांनी आता सुटकेचा निःश्वास सोडलेला असला तरी प्रत्यक्ष मतदानात त्याचे कसे रिझल्ट मिळतात, त्याविषयी जनसामान्यांमध्ये उत्सुकता आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button