राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत सर्व सहा उमेदवारांची बिनविरोध निवड
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्या सर्व सहा उमेदवारांची अपेक्षेनुसार बिनविरोध निवड झाली आहे. त्यासंदर्भात अधिकृत घोषणा मंगळवारी उशिरा झाली. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली.
बिनविरोध उमेदवारांमध्ये भाजपाकडून उमेदवारी मिळालेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पुण्याच्या मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे आणि शिवसेनेचे मिलिंद देवरा यांचा समावेश आहे. सर्वजण राज्यसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले आहेत. 16 फेब्रुवारीला अर्जाच्या छाननीत एक अर्ज बाद ठरल्याने 6 जागांसाठी 6 उमेदवार राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात होते.
सोनिया गांधी राजस्थानमध्ये बिनविरोध
राजस्थानमध्येही राज्यसभेच्या तीन रिक्त जागांवर निवडणूक घेण्यात आली. त्याठिकाणी देखील काँग्रेसच्या उमेदवार सोनिया गांधी, तसेच भाजपाचे उमेदवार चुन्नीलाल गरसिया आणि मदन राठोड बिनविरोध निवडून आले आहेत.