भाजपचा गेम प्लॅन ! मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे होणार शिवसेना पक्षप्रमुख ?
जळगाव टुडे । एकेकाळी ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात रणशिंग फुंकणारे मनसे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray) हे लोकसभा निवडणुकीत त्याच भाजपासाठी आता प्रचार करताना दिसत आहेत. याच कामाची बक्षिसी म्हणून भाजपा राज ठाकरे यांना भविष्यात शिवसेना पक्षप्रमुख देखील बनवू शकते. एकनाथ शिंदे सध्या शिवसेनेचे प्रमुख असले तरी राज ठाकरे यांच्याकडे ते पद देण्यात येणार आहे, अशी चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. एका पक्षाच्या मोठ्या नेत्याने त्यासंदर्भात वक्तव्य करून सर्वांचे लक्ष देखील वेधून घेतले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे हे त्यांचा पक्ष शिंदेंच्या शिवसेनेत विलीन करणार का किंवा शिवसेना पक्षप्रमुख पद हे राज ठाकरे यांच्याकडे जाणार का, याविषयी प्रामुख्याने सध्या राज्यात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. भविष्यात जर असे घडले तर उद्धव ठाकरे यांची सध्याची शिवसेना विरुद्ध राज ठाकरे यांची भविष्यातील शिवसेना, असा संघर्ष पाहायला मिळू शकतो. त्यावेळी ती दोघांची अस्तित्वाची लढाई सुद्धा असू शकेल, असे बोलले जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही त्यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य देखील केले आहे.
“भाजपचा जो गेमप्लॅन आहे, तो समजला पाहिजे. मोदी म्हणाले उद्धव ठाकरेंची परिस्थिती वाईट झाली तर आम्ही त्यांना मदत करु, असे विधान करून त्यांनी एक प्रकारे गाजर दाखवले आहे. दुसऱ्या बाजुचा विचार केला तर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांना भाजपने प्रचारात घेतले आहेच. हळूवारपणे मेन रजिस्टर्ड अर्थात नोंदणीकृत शिवसेना पक्ष जो सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, ती शिवसेना राज ठाकरे यांच्याकडे देण्याचा घाट तर घातला जात नाही ना,” असाही प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.