Rain News : राज्यात आजही विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट; जाणून घ्या जळगाव जिल्ह्याची स्थिती…!
Rain News : राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत असून काही ठिकाणी विजांसह पावसाने हजेरी देखील लावली आहे. मात्र, उन्हाचा चटका वाढल्यामुळे उकाडा प्रचंड वाढला आहे आणि नागरिकांना घामाच्या धारांनी हैराण केले आहे. आज दिनांक २१ सप्टेंबर रोजी मराठवाड्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) जारी केला आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागांतही विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Rain News : Yellow alert of stormy rain with lightning in the state today; Know the status of Jalgaon district…!
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज शनिवारी बीड तसेच धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. याशिवाय जळगाव तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, खरीप हंगामातील पिके नेमकी काढणीवर आलेली असताना, पावसाची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
मॉन्सूनला पोषक असलेला कमी दाबाचा पट्टा सध्या बिकानेर, शिवपुरी, सिधी, जमशेदपूर, दिघा ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय झाला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज (ता. २१) उत्तर अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होणार आहे. यामुळे सोमवारपर्यंत (ता. २३) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या स्थितीमुळे पुढील काही दिवसांत काही भागात पावसाची शक्यता असून, संभाव्य हवामान बदलांचा अंदाज घेऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.