Rain News : राज्यात आजही जोरदार पावसाचा इशारा; जाणून घ्या जळगाव जिल्ह्याची कशी राहील स्थिती…?
Rain News : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढला असून, कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात मध्यम ते जोरदार वादळी पावसाने तडाखा दिला आहे. आज गुरूवारी (ता.२६) देखील पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः पालघर आणि नाशिक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने अतिदक्षतेचा रेड अलर्ट जारी केला आहे.
Rain News : Warning of heavy rain in the state today; Know how will be the status of Jalgaon district…?
दरम्यान, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आता निवळले असून उत्तर कोकणापासून बांग्लादेशातील चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता कायम आहे, मात्र परतीच्या मॉन्सूनचा प्रवास देशाच्या इतर भागांमध्ये लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने व्यक्त केलेला जिल्हानिहाय पावसाचा अंदाज
हवामान विभागाकडून पालघर, नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, रायगड, नंदुरबार, धुळे, पुणे जिल्ह्यात अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नगर, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा येलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय बीड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.