Rain News : राज्यात आजही विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता; जाणून घ्या जळगाव जिल्ह्याची स्थिती
Rain News : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात आज रविवारी (ता.०१ सप्टेंबर) देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः विदर्भातील नागपूर, यवतमाळ तसेच चंद्रपुरात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट तसेच नांदेड, अमरावती, वर्धा आणि गडचिरोलीत जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यातही विजांसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Rain News : Chance of heavy rain with lightning in the state today; Know the status of Jalgaon district
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे सरकला आहे. अरबी समुद्रातील चक्रीवादळापासून सुरू होणारा हा पट्टा नालिया, मालेगाव, ब्रह्मपुरी, जगदलपूर, कलिंगपट्टनम आणि मध्य बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या केंद्रापर्यंत पसरलेला आहे. दक्षिण गुजरातपासून केरळपर्यंतच्या किनाऱ्याला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा निवळल्याने पावसाच्या उघडीपीत वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यात तापमानात वाढ झाली असून, तापमान तिशीच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा वाढलेला आहे. दुसरीकडे पावसाळी वातावरणाची निर्मिती सुद्धा झाली आहे. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी लागताना दिसून आली आहे.
हवामान विभागाने व्यक्त केलेला जिल्हानिहाय पावसाचा अंदाज (ता.०१ सप्टेंबर)
■ मुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) : नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर.
■ जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली.
■ जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) : रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, परभणी, हिंगोली, अकोला.
■ विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : धुळे, जळगाव, नाशिक, नगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, बुलडाणा, भंडारा, गोंदिया.