शेतकऱ्यांना कापसाची खाज…सरकारला मात्र सत्तेची खाज !
जळगावच्या सभेत उद्धव ठाकरे यांची टीका
जळगाव टुडे । “बाजारात अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. त्याकापसामुळे शेतकऱ्यांच्या अंगाला खाज देखील सुटलेली आहे. शेतकऱ्यांच्या कापसाला भाव न देणाऱ्या सरकारला मात्र सत्तेची खाज सुटलेली आहे”, अशी टीका शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केली. त्यासोबत ही खाज तुम्हाला लोकसभा निवडणुकीत घालवायची आहे, असेही आवाहन ठाकरे यांनी उपस्थितांना केले.
जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील-पवार यांच्या प्रचारार्थ जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात महायुतीच्या नेतृत्वावर जोरदार टीका करताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी वाचा फोडली. याप्रसंगी महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील आणि त्यांचे काका माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांना जवळ बोलावून त्यांना एकत्र आणण्याचे काम शिवसेनेने केल्याचे सांगितले. भाजप हा पक्ष काका व पुतण्यांचे घर फोडतो, असेही त्यांनी नमूद केले.
“शेतकऱ्यांना सहा हजार रूपये किसान सन्मान निधी देण्यात येत आहे, दुसरीकडे शेती अवजारे, बियाणे व रासायनिक खतांवर 18 टक्के जीएसटी आकारून ते पैसे वसूल केले जात आहेत. जळगावच्या एमआयडीसीत आतापर्यंत किती उद्योग आले, दोन कोटी बेरोजगारांना नोकरी देण्याचे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले होते त्याचे पुढे काय झाले,” असे अनेक प्रश्न उद्धव ठाकरे यांनी जळगावच्या सभेत भाषण करताना उपस्थित केले.