जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या औषधींसाठी 1 कोटी 85 लाखांचा निधी
Primary Health Centre : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यपूर्ण सेवा पोहचावी म्हणून शासन विविध योजना राबवित आहे. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेतून जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना लागणाऱ्या औषधींसाठी सुमारे 5 कोटी रूपये निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी 1 कोटी 85 लाख रूपये निधीला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी दिली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर निधी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रासाठी आवश्यक असलेल्या औषधी खरेदीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंजुरी दिली आहे. या मंजुर अनुदानातून औषधी खरेदी करण्याकरीता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने आरोग्य विभागाकडून निविदा देखील प्रसिध्द करण्यात आली आहे. औषधी लवकरात लवकर खरेदी करून जिल्हयातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना पुरविण्यात येणार असल्याची माहिती डॉ.भायेकर यांनी दिली.