ममुराबाद येथे पडझड झाल्याने पुरातन खंडेराव देवस्थानाचे अस्तित्व धोक्यात !
ठेकेदाराचा निष्काळजीपणा कारणीभूत
जळगाव टुडे | तालुक्यातील ममुराबाद येथे सुमारे साडेतीनशे वर्षे पुरातन प्रतिजेजुरी खंडेराव देवस्थानाचे अस्तित्व धोक्यात आल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी (ता.11) उघडकीस आला. देवस्थान पुनर्विकासाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे सदरचा प्रकार घडला असून, त्याठिकाणी पहिल्याच पावसात मोठी पडझड झाली आहे. याबद्दल ममुराबादच्या ग्रामस्थांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (Pratijejuri Mamurabad)
ममुराबाद येथील पुरातन खंडेराव देवस्थानाच्या पुनर्विकासासाठी सुमारे तीन कोटी रूपयांचा निधी तीर्थक्षेत्र विकास योजनेतून मंजूर झाला आहे. त्यामाध्यमातून खंडेराव देवस्थानाची संरक्षण भिंत तसेच मुख्य गाभाऱ्याच्या सभोवतालचे सुशोभीकरणाचे काम सध्या संबंधित ठेकेदाराने हाती घेतले आहे. दरम्यान, ठेकेदाराने पुढे पावसाळ्याचे दिवस आहेत हे लक्षात न घेता आधी संरक्षण भिंतीचे काम करण्यावर भर दिला. त्यानंतर आता पावसाळा सुरू झाल्यावर मुख्य गाभाऱ्याच्या आजुबाजुचे काम सुरू केले आहे. त्यामुळे सगळा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आहे.
दरम्यान, खंडेराव देवस्थानाच्या गाभाऱ्याचे काम करताना पूर्वीच्या जुन्या बांधकामाला धक्का न लावता नवीन काम करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात संबंधित ठेकेदाराने जुने बांधकाम पाडून त्याजागी नवीन काम करण्याचा प्रयत्न केला. अर्थातच, आतून फार मजबूत नसलेल्या फाउंडेशनवर अनादी काळापासून उभ्या मुख्य गाभाऱ्याला त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला. सोमवारी (ता.10) रात्री पडलेल्या जोरदार पावसात खंडेराव देवस्थानाचे बरेच मोठे नुकसान झाले. मोठी पडझड झाल्याने देवस्थानाचे अस्तित्वच त्यामुळे धोक्यात आले. घडलेला प्रकार माहिती पडल्यानंतर मंगळवारी सकाळी अनेक ग्रामस्थांनी त्याठिकाणी गर्दी केल्याचे दिसून आले.