शेतकऱ्यांसाठी खुशखबर…’या’ दिवशी बँक खात्यात जमा होणार पीएम किसानचा 17 वा हप्ता !
जळगाव टुडे । लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे केंद्र सरकारकडून वितरीत करण्यात येणारा पीएम किसान (PM Kisan) योजनेचा हप्ता रखडला होता. त्यामुळे संबंधित सर्व शेतकऱ्यांचे तिकडे लक्ष देखील लागले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः देशातील सुमारे 09 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच 17 व्या हप्त्याचे प्रत्येकी 2000 हजार रूपये वितरीत करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याची तारीख देखील जाहीर झाली आहे.
तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. सदर योजनेच्या खर्चाची तरतूद म्हणून केंद्र सरकारकडून आधीच सुमारे 20 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामाध्यमातून देशातील तब्बल 09 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ मिळू शकणार आहे. दरम्यान, पीएम किसानच्या 17 व्या हप्त्यापोटी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 18 जून रोजी प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याचा बँक खात्यात 2000 रूपये वितरीत करणार असल्याचे सांगितले जात आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषीत होण्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात पीएम किसानचा 16 वा हप्ता वितरीत करण्यात आला होता. त्यानंतर मात्र लाभार्थी शेतकऱ्यांना कोणतीच रक्कम मिळालेली नाही. अनेक शेतकरी 17 वा हप्ता कधी येणार म्हणून वाट पाहत बसले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आटोपल्यानंतर अखेर आता पीएम किसानची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 18 जून रोजी काशी दौऱ्यावर असून, त्याठिकाणाहून ते पीएम किसानचा 17 वा हप्ता वितरीत करतील तसेच शेतकरी परिषदेला संबोधित करतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.