जळगावच्या 4 लाखांवर शेतकऱ्यांना मिळणार 240 कोटी रूपयांचा निधी
PM kisan : पीएम किसान योजनेंतर्गत 2000 रूपये तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत दुसरा व तिसरा हप्ता मिळून 4000 रूपये, असे एकुण 6000 रूपये राज्यातील सुमारे 88 लाख पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात बुधवारी (ता. 28) थेट जमा होणार आहेत. त्यातून जळगाव जिल्ह्यातील सुमारे 4 लाखांवर शेतकऱ्यांनाही तब्बल 240 कोटी रूपये निधी प्राप्त होणार आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा माहे डिसेंबर 2023 ते मार्च 2024 कालावधीतील 16 वा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवार (28 फेब्रुवारी) रोजी यवतमाळ येथील समारंभात वितरीत होणार आहे. त्यानिमित्ताने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत दुसरा व तिसरा हप्ता एकत्रित वितरीत करण्याचे नियोजन महाराष्ट्र शासनाने केले आहे. केंद्र शासनाने 28 फेब्रुवारी 2024 हा दिवस संपूर्ण देशभर पीएम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) च्या 16 व्या हप्त्यापोटी प्रत्येकी 2000 रूपये प्रमाणे 80 कोटींपेक्षा जास्त निधी जमा होणार आहे. तसेच नमो शेतकरी महासन्मान निधीच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यापोटी प्रत्येकी 4 हजार प्रमाणे सुमारे 160 कोटींपेक्षा जास्त निधी जमा होईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.