पावसाळी वातावरणामुळे भुईमुगाची ओली शेंग खाऊ लागली भाव !
जळगाव टुडे | पावसाळी वातावरणात भुईमुगाच्या भाजलेल्या गरमागरम शेंगा खाण्याची मजा काही औरच असते. त्यातल्या त्यात ओली शेंग अधिकच चवीने खाल्ली जाते. यामुळेच यंदाही पावसाळा सुरू होत नाही तेवढ्यातच सगळीकडे भुईमुगाच्या ओल्या शेंगांची मागणी वाढली असून, त्या बाजारात चांगला भाव देखील खाताना दिसत आहेत. (Peanut pods)
राज्यातील बरेच शेतकरी खास पावसाळ्याच्या तोंडावर काढणीवरील येतील, या हिशेबाने लांब टपोऱ्या दाण्यांच्या भुईमुगाची लागवड करतात. शेतातून काढून आणलेली शेंग लगेचच बाजारात विक्रीसाठी आणली जात असल्याने ग्राहकांची तिला विशेष पसंती देखील दिली जाते. ग्राहक ओल्या भुईमुगाच्या शेंगांसाठी बऱ्याचवेळा जास्तीचे पैसे देखील मोजतात. यंदाही बाजारात भुईमुगाच्या ओल्या शेंगा विक्रीसाठी दाखल होऊ लागल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी (ता.11) राज्यातील ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये भुईमुगाच्या ओल्या शेंगांची सुमारे 272 क्विंटलपर्यंत आवक झाली होती. पैकी जळगावमध्ये भुईमूग शेंगाची 37 क्विंटल आवक होऊन 4000 ते 5000, सरासरी 4500 रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. अहमदनगरमध्ये 24 क्विंटल आवक होऊन 3150 ते 4150, सरासरी 3650 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. अमरावतीत 120 क्विंटल आवक होऊन 4000 ते 4500, सरासरी 4250 रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. नागपूरमध्ये फक्त एक क्विंटल आवक झाली आणि सरासरी 5000 रूपये प्रति क्विंटलचा भाव मिळाला. पुण्यातही भुईमुगाच्या ओल्या शेंगांची 90 क्विंटल आवक झाली आणि 3000 ते 5000, सरासरी 4000 रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला.