जळगाव येथील प्रविण सपकाळे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष
Patrakar Sangh Nivad : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई या संघटनेच्या राज्य कार्याध्यक्षपदी जळगाव येथील प्रविण सपकाळे यांची निवड झाली आहे. पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्य कमिटीच्या बैठकीत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. श्री. सपकाळे हे जळगावमधून प्रकाशित होणाऱ्या दैनिक ‘नजरकैद’चे संपादक आहेत.
पुणे येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात पत्रकार संघाचे उपक्रमशील पदाधिकारी असलेले उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष असलेले प्रवीण सपकाळे यांची राज्य कार्याध्यक्ष म्हणून निवड केल्याचे जाहीर करण्यात आले. श्री. सपकाळे यांना सर्व राज्य कार्यकारीणीच्या पदाधिकारी व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. यावेळी राज्य प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, खान्देश विभाग प्रमुख किशोर रायसाकडा, विदर्भ विभाग अध्यक्ष महेश पानसे, मराठवाडा विभाग अध्यक्ष वैभव स्वामी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी माझ्यावर राज्य कार्यध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविल्याने माझी जबाबदारी निश्चितच वाढली आहे. संघटनेत काम करणाऱ्या एका ग्रामीण भागातील सामान्य पत्रकारावर संघटनेने विश्वास दाखवला. त्यामुळे यापुढेही संघटनेत व्रतस्थ भावनेने काम करण्याचा प्रयत्न राहील. वसंतराव मुंडे यांची तळागाळातील पत्रकारांसाठी लढण्याची तळमळ, लढाऊ वृत्ती आमच्यासाठी प्रेणादायी आहे.
-प्रविण सपकाळे (कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ)