पारोळा तालुक्यात महामार्गावर दुचाकी घसरली, भरधाव टँकरने माय-लेकास चिरडले

सारवे-बाभळे फाटा दरम्यानची घटना

Jalgaon Today : जळगाव ते धुळे महामार्गावर पारोळा तालुक्यातील सारवे-बाभळे फाट्यादरम्यान (Accident News) दुचाकीवरील पती-पत्नी व त्यांच्या मुलाचा भीषण अपघात झाला. त्यात माय व लेकाचा मागून येणाऱ्या भरधाव टँकरने चिरडल्याने जागीच मृत्यू झाला असून, दुचाकीस्वार पशुवैद्यक जखमी झाले आहेत. या अपघाताची पारोळा पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

कुकावल (ता.शहादा) येथे पशुवैद्यक असलेले डॉ.प्रतीक सुनील पाटील (वय ३०) हे पत्नी पूनम पाटील (वय २४) व मुलगा अगस्त पाटील (वय १ वर्षे) यांच्यासह पारोळा तालुक्यातील चिखलोद (ता.पारोळा) येथे आपल्या मित्राच्या लग्न समारंभासाठी आले होते. लग्नसमारंभ आटोपल्यानंतर ते दुचाकीने (एमएच ३९/ एएच ०७०४) एरंडोल येथे मामाच्या घरी निघाले होते. राष्ट्रीय महामार्गावर पारोळा तालुक्यातील सारवे-बाभळे नाग फाट्यादरम्यान त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. उन्हामुळे डांबर निघून खडी उखडली होती. त्याठिकाणी नेमकी दुचाकी घसरल्याने तिन्हीजण रस्त्यावर पडले आणि त्याचवेळी मागून येणाऱ्या भरधाव टँकरचे (एमएच ४०/सीटी ४०९७) चाक पूनम व अगस्त यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. डॉ. प्रतीक हे विरुद्ध दिशेला फेकले गेल्याने बचावले. दरम्यान, पत्नी आणि मुलाचा डोळ्यादेखत तडफडत मृत्यू झालेला पाहून डॉ.प्रतीक यांनी घटनास्थळीच आक्रोश केला. जखमी डॉ. प्रतीक व मृतांना तत्काळ रुग्णवाहिकेतून पारोळ्यातील कुटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button