परिवर्तन जळगाव निर्मित कलाकृतींचे इचलकरंजी व गोव्यात आज आणि परवा होणार सादरीकरण !
जळगाव टुडे । येथील परिवर्तन संस्था व भवरलाल अँड कांताई जैन फाऊंडेशन निर्मित निसर्ग कवी ना. धों. महानोर यांच्या कवितांवर व गाण्यांवर आधारित ‘हा कंठ दाटुनी आला ‘ कार्यक्रम इचलकरंजी येथील प्रसिद्ध मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत आज रविवारी (ता.19) सादर होणार आहे. सदर व्याख्यानमालेचे हे 24 वे वर्ष असून महानोरांना त्यामाध्यमातून स्वरांजली अर्पण केली जात आहे. यासोबतच गोव्यातील मडगावात गोमंत विद्या निकेतन संस्थेतर्फे आयोजित पंचमवेद नाट्य महोत्सवात परिवर्तन निर्मित दोन अंकी नाटक अपूर्णांक मंगळवारी (ता.21) सादर केले जाणार आहे. (Parivartan Jalgaon)
इंचलकरंजीत आयोजित ‘हा कंठ दाटुनी आला’ कार्यक्रमात जळगावचे कलावंत सुदीप्ता सरकार, अर्चना खासणीस, अक्षय गजभिये, मंजूषा भिडे, अंजली धुमाळ, सुनीला भोलाणे, गौरव कालंगे, हर्षल पाटील, राहुल भावसार, मोना निंबाळकर, सोनाली पाटील, प्रतीक्षा कल्पराज, किर्तेश बाविस्कर हे सहभागी होत आहेत. गोव्यातील मडगाव येथील गोमंत विद्या निकेतन संस्थेतर्फे 20 ते 23 मे दरम्यान तीन दिवस पंचमवेद नाट्य महोत्सव आयोजीत करण्यात आला आहे. त्याचीही सुरवात ‘हा कंठ दाटुनी आला’ या कार्यक्रमाने होणार आहे. महोत्सवात 21 मे रोजी परिवर्तन निर्मित दोन अंकी नाटक अपूर्णांक देखील सादर केले जाणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन नारायण बाविस्कर यांचे असून मूळ हिंदी लेखक मोहन राकेश लिखित नाटकाचे शंभू पाटील यांनी मराठीत रूपांतर केले आहे. या नाटकात मंजुषा भिडे, राहूल निंबाळकर प्रतीक्षा कल्पराज, मोना निंबाळकर व शंभू पाटील यांचा अभिनय असणार आहे.
परिवर्तन निर्मीत सकस अशा कलाकृतींना महाराष्ट्रासह गोव्यातील विविध संस्था नेहमीच आमंत्रित करीत असतात. याबद्दल जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी सर्व कलावंतांचे अभिनंदन केले आहे. ‘हा कंठ दाटुनी आला’ या सांगीतिक कार्यक्रमाची निर्मिती भवरलाल अँड कांताई जैन फाऊंडेशन व परिवर्तन संस्थेने केली आहे.