कांदा रडवणार…ग्राहकांवर 50 रूपये किलो प्रमाणे खरेदी करण्याची येईल वेळ !
जळगाव । पावसाळा सुरू झाल्यानंतर कांदा हमखास भाव खातो. कारण, या दिवसात कांदा खराब होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. यंदाही त्याची प्रचिती येत असून, कांद्याचे भाव आतापासूनच किरकोळ बाजारात 25 ते 30 रूपये प्रति किलोपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. पुढील काळात ग्राहकांची मागणी वाढल्यानंतर पुरेशी आवक होणार नाही, तेव्हा अर्थातच कांद्याचा भाव हा सुमारे 50 रूपये किलो किंवा त्यापेक्षा जास्त होण्याची शक्यता त्यामुळे व्यक्त होत आहे. ( Onion Market )
अवकाळी पावसाचा फटका बसल्याने कांद्याच्या उत्पादनावर यंदा विपरीत परिणाम झाल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच खुल्या बाजारात कांद्याचे भाव हे शासकीय खरेदी केंद्रांपेक्षा जास्त राहिले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारला यावर्षी कांद्याचा पुरेसा साठा करता आलेला नाही. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार सरकारने सन 20024/25 साठी सुमारे पाच लाख टन कांदा खरेदीचे उद्दीष्ट ठेवले होते आणि सर्व कांदा शेतकऱ्यांकडूनच खरेदी केला जाणार होता. प्रत्यक्षात यंदाच्या हंगामात सरकारला आतापर्यंत 50 हजार टन कांद्याची खरेदी सुद्धा करता आलेली नाही, अशी माहिती मिळाली आहे. रब्बी कांद्याचा हंगाम आटोपलेला असल्याने सरकारला कांद्याची आणखी खरेदी करणे आता शक्य होणार नाही, हे सुद्धा तितकेच खरे आहे. त्याचा थेट परिणाम आता कांद्याच्या बाजारावर होण्याची शक्यता बळावली आहे. पावसाळ्यात साठवणूक केलेला कांदा त्यामुळे 50 रूपये किंवा त्यापेक्षा जास्त भावाने विकला जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
सरकारला कांदा का मिळाला नाही ?
ग्राहकांना महागाई झाल्यानंतर स्वस्तात कांदा पुरवठा करता यावा म्हणून सरकार दरवर्षी सुमारे पाच लाख टन कांद्याची खरेदी बफर स्टॉकसाठी करत असते. त्याकरीता नाफेड तसेच एनसीसीएफ या एजन्सी कांदा खरेदीचे काम करतात. मात्र, यंदाच्या हंगामात खुल्या बाजारात कांद्याला जास्त भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी नाफेड तसेच एनसीसीएफ यांना कांदा विकलाच नाही. सरकारी खरेदीची किंमत 2555 रूपये प्रति क्विंटल असताना, शेतकऱ्यांना बाजार समित्यांमध्ये 2900 रूपये क्विंटलपर्यंत खरेदीदर मिळाला. परिणामी, सरकारला त्यांचे बफर स्टॉकचे उद्दीष्ट गाठता आलेच नाही.