कांदा निर्यातबंदी उठविताना केंद्र सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा डबल गेम केल्याचा आरोप
Jalgaon Today : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी (Onion Export) उठविताच त्याचे भांडवल राजकीय पक्षांकडून केले जात असून, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे. प्रत्यक्षात निर्यातबंदी उठविताना केंद्र सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा डबल गेम केल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. कारण, केंद्राने कांदा निर्यातीसोबतच भाव जास्त वाढणार नाही, याची काळजी घेतली आहे. कांदा निर्यातीबंदी उठवितानाच प्रतिटन ५५० डॉलर किमान निर्यात मूल्य आणि ४० टक्के निर्यात शुल्क त्यावर लावले आहे.
केंद्राच्या पथकाने नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजारात एप्रिलपासून स्थिर असलेले कांद्याचे दर, अहमदनगर, नाशिक, सोलापूरला जाऊन रब्बीच्या हंगामातील कांद्याच्या पिकाची केलेली पाहणी तसेच व्यापारी, शेतकरी, चाळी, केंद्रीय भांडार आणि गोदामांमधील साठ्यांची माहिती घेतली. चौथ्या महिन्यापासून ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत होणाऱ्या कांद्याच्या हानीची जोखीम लक्षात घेऊन मुबलक उपलब्धतेच्या आधारे कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी हटविण्याचा निर्णय उशिरा का होईना घेतला.
केंद्राने घेतलेल्या निर्णयानुसार कांदा निर्यातीसाठी आता टनाला किमान ७७० डॉलर किंमत असेल. रुपयात जर याचा हिशोब केला तर टनामागे किमान ६४ हजार २०२ रुपये दराने कांदा निर्यात होईल. म्हणजेच निर्यातीच्या कांद्याचा किमान भाव किलोमागे ६४ रुपये असेल. त्यावर वेगवेगळ्या देशांना निर्यातीसाठी खर्च येतो ५ रुपयांपर्यंत. त्यामुळे कांदा जातो किलोला ७० रुपयांच्या घरात. पण आंतरराष्ट्रीय बाजारातील भावाचा विचार केला तर अनेक देशांमध्ये कांद्याचा भाव ७० रुपयांपेक्षा कमीच आहे. केवळ दुबईसह आखाती देशांमध्ये कांद्याचा भाव ७० ते ७५ रुपये किलो आहे. तर इजिप्त, चीन, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि इतर देशांमध्ये कांदा ४५ ते ६० रुपयांच्या दरम्यान आहे. मग निर्यात किती होणार ? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होतो आहे. तसेच निर्यातबंदी उठवली तरी कांद्याचे भाव मर्यादेतच वाढण्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे.