शेतकऱ्यांसाठी खुशखबर…केंद्र सरकारकडून 99,150 मेट्रीक टन कांदा निर्यातीला परवानगी
महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा
Jalgaon Today : देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना, केंद्र सरकारने बांगलादेशासह युएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये 99 हजार 150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढल्याने घेण्यात आलेल्या निर्यातीच्या या निर्णयाचा मोठा फायदा विशेषतः महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त 2000 मेट्रिक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला (Onion Export) देखील केंद्राने परवानगी दिली आहे.
याआधी केंद्र सरकारने देशांतर्गत साठा कायम राखण्यासाठी आणि भाव वाढू नये म्हणून कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क ऑगस्ट 2023 मध्ये लावले होते. त्यानंतर देशभरात कांद्याचे भाव झपाट्याने वाढू लागले आणि अवघ्या आठवडाभरात ते दुप्पट झाले होते. अशा परिस्थितीत ग्राहकांवरील भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारने 27 ऑक्टोबरपासून राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) आणि NAFED या सारख्या सरकारी विक्री केंद्रांद्वारे 25 रुपये प्रति किलो दराने कांद्याची विक्री सुरू केली होती. चालू आर्थिक वर्ष 2023-24 साठी सरकारने 5 लाख टन कांद्याचा साठा बफरमध्ये ठेवला आहे, तो साठा आणखी 2 लाख टनांनी वाढवून 7 लाख टन करण्याच्या योजनेवरही सरकारने काम केले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने गेल्या वर्षी कांद्यावर निर्यातबंदी लादल्याने सगळीकडे नाराजी पसरली होती. मात्र, आता पुन्हा निर्यातीला चालना मिळाल्याने कांदा उत्पादकांची नाराजी दूर होऊ शकणार आहे.