लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा विराजमान झालेले ओम बिर्ला आहेत तरी कोण ?
जळगाव टुडे । भाजपचे खासदार ओम बिर्ला ( Om Birla ) यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार व काँग्रेसचे आठ वेळा खासदार राहिलेले कोडिकुनिल सुरेश यांचा आज बुधवारी आवाजी मतदानाने पराभव केला. लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बिर्ला खुर्चीवर विराजमान झाले तेव्हा त्यांच्यासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू हे देखील उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात प्रस्ताव मांडल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते ओम बिर्ला यांच्या लोकसभा अध्यक्षपदी निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला. बिर्ला यांची यावेळी सलग दुसऱ्यांदा संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली असून, ते राजस्थानच्या कोटा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. सन २०१४ मध्ये ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. ओम बिर्ला यांचा जन्म सन १९६२ मध्ये झाला असून, त्यांनी १९८७ मध्ये कोटा येथील भाजपाच्या युवा शाखेचे जिल्हाध्यक्ष म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केली होती.
ओम बिर्ला यांनी केला हा विक्रम
त्यांच्या नेतृत्वाखालील सन २०१९ मधील पहिल्याच सत्रात पहिल्यांदा सदस्यांना बोलण्याची संधी मिळाली होती आणि पहिल्या सत्राच्या काही तासातच सदस्यांनी सुमारे १,०६६ विषय उपस्थित केले गेले होते. लोकसभेच्या इतिहासातील तो एक विक्रम होता. बिर्ला हे पहिले अध्यक्ष होते, ज्यांनी खासदारांना त्यांच्या भाषणांच्या क्लिपिंग्स सोशल मीडियावर प्रसारित करण्याची परवानगी दिली. संसदेचे नवीन इमारतीत स्थलांतर बिर्ला यांच्या पहिल्या कार्यकाळात झाले आहे. यंदाची ही लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून भारतीय लोकसभेच्या इतिहासात सलग दोन वेळा अध्यक्षपद भूषवणार्या अय्यंगार आणि जीएमसी बालयोगी यांच्या यादीत ओम बिर्ला यांच्याही नावाचा समावेश आता झाला आहे.