Nitin Gadkari : जळगावमधील महामार्ग चौपदरीकरणासह काँक्रिटचा होणार; प्रस्ताव सादर करण्याच्या मंत्री नितीन गडकरींच्या सूचना..!

Nitin Gadkari : जळगाव शहरातील महामार्गाचा पाळधी ते तरसोद दरम्यानचा बांभोरी ते गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंतचा भाग चौपदरीकरणासह काँक्रिटीचा करावा, त्यानंतर तो शहराच्या संबंधीत यंत्रणेकडे हस्तांतरीत करावा. तसेच या महामार्गावर बांभोरीजवळ गिरणा नदीवर नव्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी प्रकल्प अहवाल तातडीने तयार करुन सादर करावा, अशा सूचना केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित यंत्रणेस दिल्या आहेत.

Nitin Gadkari : Highway in Jalgaon city will be made of concrete with four-lane; Minister Nitin Gadkari’s instructions to submit proposals..!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेण्यासाठी जळगाव येथील काही नागरिकांचे हे शिष्टमंडळ जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या मार्गदर्शनाखाली गेले होते. जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी त्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. शिष्टमंडळात क्रेडाई संघटनेच्या राज्य शाखेचे उपाध्यक्ष अनिष शहा, कोगटा उद्योग समूहाचे संचालक प्रेम कोगटा, स्पेक्ट्रम इलेक्ट्रीकल्स लिमिटेडचे अध्यक्ष दीपक चौधरी, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, मल्टिमीडिया फीचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सुशील नवाल, पत्रकार दिलीप तिवारी यांचाही समावेश होता. अतुल जैन यांच्यासह शिष्टमंडळाने नितीन गडकरी यांना जळगाव शहरातील महामार्गाची सध्याची दुरावस्था, वाढलेल्या अपघातांची संख्या आणि राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणच्या जळगाव प्रकल्प अधिकाऱ्यांकडून असलेल्या अपेक्षा याविषयी सविस्तर माहिती दिली.

जळगावच्या शिष्टमंडळाने नितीन गडकरींसमोर मांडलेले मुद्दे आणि त्यांनी दिलेले आदेश…

मांडलेला मुद्दा १. – धुळे ते तरसोद बायपासचे काम रखडले आहे. त्यावरील धुळे, पाळधी आणि तरसोदजवळील वळण महामार्गाचे काम थांबलेले आहे. बाह्यवळण महामार्गाचे काम लवकर पूर्ण झाल्यास जळगाव शहरातील वाहतुकीचे अनेक प्रश्न सुटतील.
नितीन गडकरी- संबंधीत अधिकाऱ्यांना कॉल करून आदेश दिले की, धुळे-जळगाव दरम्यानच्या महामार्गाचे काम जर ठेकेदार वेळेत करीत नसेल आणि त्यात संबंधिताला आर्थिक अडचणी असतील तर त्याला ब्लॅकलिस्ट करा आणि नव्या ठेकेदाराला हे काम द्या.

मांडलेला मुद्दा २. – जळगाव शहरातील महामार्गाची अवस्था अत्यंत वाईट झालेली असून, अपघातांची संख्या वाढून त्यात मनुष्यहानी होत आहे. या महामार्गाचा विस्तार करुन त्याची उंची वाढवून दोन्ही बाजूस एलईडी पथदीप लावावेत, मोठ्या आकारातील गटारीचे बांधकाम करावे.
नितीन गडकरी- संबंधीत अधिकाऱ्यांना कॉल करून आदेश दिले की, ‘पाळधी ते तरसोद या महामार्गावरील जळगाव शहरातील काम हे चौपदरी व काँक्रीटचे करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा. जळगाव शहरातील सध्याच्या महामार्गाविषयी प्रचंड तक्रारी आहेत. मी स्वतः जळगाव दौऱ्यावर गेलो तेव्हा त्याचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे या महामार्गाचे चौपदरी कॉन्क्रीटीकरण करणे आवश्यक असून त्याचा प्रस्ताव तातडीने तयार करावा. जळगाव शहरातील सुरक्षीत आणि टिकाऊ असा महामार्ग दुरुस्त करून तो संबंधीत यंत्रणेच्या ताब्यात देणे ही राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणची जबाबदारी आहे.

मांडलेला मुद्दा ३. – पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान ग्रीनफील्ड इकॉनोमिक कॉरिडॉर मंजूर झालेला आहे. या प्रकल्पात जळगावाचा समावेश करावा. त्याचे कार्यक्षेत्र जळगावपर्यंत वाढवावे. तसे केल्यास जिल्ह्यातील उद्योग, व्यापार, व्यवसाय तसेच शेतीमाल व प्रक्रिया उत्पादन थेट इतर जिल्ह्यात व राज्यात पोहोचविणे शक्य होईल. जळगाव परिसरातील पर्यटन, हॉटेल, खासगी वाहतुक सेवा, दळणवळण सेवा वाढीस प्रोत्साहन मिळेल. भुसावळ येथील रेल्वेचा ड्रायपोर्ट आणि जळगाव विमानतळातील विस्तारणाऱ्या सुविधा यामुळे लघुउद्योग वाढीस प्रोत्साहन मिळून रोजगाराच्या संधी वाढतील.
नितीन गडकरी- संबंधीत अधिकाऱ्यांना कॉल करून आदेश दिले की, ग्रीनफिल्ड इकॉनोमिक कॉरिडॉरमध्ये जळगावचा सहभाग वाढविण्याची सूचना नक्कीच विचार करण्यासारखी आहे. या संदर्भात लवकरात लवकर प्राथमिक सर्व्हे करावा. अजिंठा जवळील वन विभागाच्या जमीनीचा काही भाग यात अडथळा आणू शकतो का ते तपासावे. जर वनविभागाचा काहीही अडथळा नसला तर ग्रीनफिल्ड इकॉनोमिक कॉरिडॉरमध्ये जळगावचा समावेश करण्याचा निक्कीच विचार करता येईल. ती बाब तपासून मला अवगत करावी.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button