Ncp Sharadchandra Pawar : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदासाठी ‘या’ दोन नावांवर शिक्कामोर्तब ?
Ncp Sharadchandra Pawar : जळगाव जिल्ह्यातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संपूर्ण जिल्हा कार्यकारीणी बरखास्त केल्यानंतर नवीन जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी मुलाखती घेतल्या होत्या. प्रत्यक्षात नवीन जिल्हाध्यक्षांची निवड अद्याप झालेली नाही. दरम्यान, राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाने जळगावच्या जिल्हाध्यक्षपदासाठी दोन नावांवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती मिळाली आहे. त्याबाबतची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
Ncp Sharadchandra Pawar: Sharadchandra Pawar NCP Jalgaon District President sealed these two names?
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात मोठे यश मिळालेले असले तरी जळगाव जिल्ह्यात दखलपात्र कामगिरी करता आली नाही. त्यामुळे जिल्ह्याची जुनी कार्यकारीणी बरखास्त करून नव्या दमाने व उत्साहाने काम करणारी नवीन कार्यकारीणी तयार करण्याचा निर्णय पक्षाच्या जिल्हा मेळाव्यात काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. प्रदेश कार्यालयाच्या सूचनेवरून त्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जिल्हाध्यक्षांसह कार्याध्यक्ष व इतर बऱ्याच पदांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्याकरीता दौरा देखील झाला होता. त्यावेळी जळगावचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर तसेच डॉ.सतीश पाटील यांनाही जिल्हाध्यक्षपद सांभाळण्याचा आग्रह झाला होता. मात्र, दोघांनी त्यास सपशेल नकार दिला होता. माजी मंत्र्यांनी त्यांचा अहवाल प्रदेश कार्यालयाकडे सादर केलेला असला, तरी नवीन जिल्हा पदाधिकाऱ्यांची नावे अजुनही गुलदस्त्यातच आहेत.
यांना राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची संधी ?
जिल्ह्याचा मोठा विस्तार लक्षात घेता अन्य राजकीय पक्षांप्रमाणेच जळगाव जिल्ह्यासाठीही दोन जिल्हाध्यक्ष व दोन कार्याध्यक्ष नियुक्त करण्याचा विचार शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने केल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार रावेर लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी उद्योजक श्रीराम पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे, तर जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे.
प्रदेशाध्यक्ष २१ जुलैला जळगावच्या दौऱ्यावर
दरम्यान, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे येत्या २१ जुलै रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत जळगाव शहरात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या जिल्हा मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले आहे. विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदर मेळावा होत असल्याने त्यात जळगावच्या जिल्हाध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडीची घोषणा होण्याची शक्यता मात्र नाही. बहुतेक प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यानंतरच दोन्ही जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्षांची तसेच अन्य पदाधिकाऱ्यांची नावे घोषीत होतील, असे सांगितले जात आहे.