जळगावच्या राष्ट्रवादीचा नवीन जिल्हाध्यक्ष कोण ? माजी मंत्री देशमुखांच्या उपस्थितीत उद्या फैसला..!

जळगाव टुडे । लोकसभेच्या निवडणुकीत जळगावसह रावेर मतदारसंघातील दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झाल्यानंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिंतन बैठकीत त्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. याशिवाय पक्षाला नवी उभारी देण्यासाठी जुन्या पदाधिकाऱ्यांना नारळ देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला होता. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार आता जळगाव जिल्हाध्यक्ष तसेच महानगराध्यक्ष व इतरही काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ( Ncp Sharadchandra Pawar )

Ncp Sharadchandra Pawar
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे खास नवीन पदाधिकारी निवडीसाठी आवश्यक मुलाखती घेण्यासाठी शनिवार व रविवार दोन दिवस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक जिल्हा कार्यालयात रविवारी (ता.०७) होणार आहे. विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या बैठकीला खूप मोठे महत्व प्राप्त झाले आहे. कारण, त्यात नवीन जिल्हाध्यक्ष व इतर मोठ्या पदावरील पदाधिकाऱ्यांच्या निवडीसंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्याठिकाणी माजी मंत्री गुलाबराव देवकर तसेच डॉ.सतीश पाटील, ज्येष्ठ नेते अरूणभाई गुजराथी यांचीही उपस्थिती राहील.

प्राप्त माहितीनुसार, माजी मंत्री अनिल देशमुख हे शनिवारी (ता.०६) रात्री नागपूरहून रेल्वेने जळगावमध्ये दाखल होतील. दुसऱ्या दिवशी त्यांच्या उपस्थितीत रविवारी (ता.०७) सकाळी साधारण १० वाजता जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या मुलाखती पक्षाच्या आकाशवाणी चौकातील जिल्हा कार्यालयात घेण्यात येतील. दरम्यान, जळगावमधील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस ( Ncp Sharadchandra Pawar ) पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी अनेकजण इच्छुक असल्याची माहिती मिळाली आहे. इच्छुक असलेल्यांनी जोरदार मोर्चेबांधणी देखील केली आहे. त्यात सहकार आघाडीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. पक्षाचे जिल्हा समन्वयक विकास पवार, प्रदेश सरचिटणीस नामदेव चौधरी हे सुद्धा मुलाखत देण्याची शक्यता आहे. माजी मंत्री अनिल देशमुख हे राष्ट्रवादीच्या मुलाखती आटोपल्यानंतर खिरोदा (ता.रावेर) येथे स्व.बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रवाना होणार आहेत.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button