जळगावच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा खोकला अखेर सुंठीवाचून गेला…!

जळगाव टुडे । पक्षाला नवी उभारी देण्यासाठी जळगावमधील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्याची संपूर्ण कार्यकारीणी नुकतीच बरखास्त केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ देखील उडाली. मात्र, राष्ट्रवादीने जिल्ह्यातील कार्यकारीणी अचानक बरखास्त केल्यानंतर काही ठराविक पक्ष विरोधी वर्तन असणाऱ्या व निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची आपोआपच उचलबांगडी झाली आहे. त्यामुळे सुंठीवाचून खोकला गेल्याची प्रतिक्रिया देखील अनेक कार्यकर्त्यांनी आता व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीने एका दगडात दोन पक्षी मारल्यानंतर त्याची सगळीकडे चर्चा देखील आहे. ( Ncp Sharadchandra Pawar )

आमदार एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत रावेर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार असलेल्या सून रक्षा खडसे यांचा उघडपणे प्रचार केला. त्यानंतरही शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे जळगावमधील काही जबाबदार पदाधिकारी हे एकनाथ खडसेंना खुले समर्थन देताना दिसले. हीच बाब जळगावमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही जुन्या पदाधिकाऱ्यांना खटकली होती. त्याविषयी त्यांनी थेट प्रदेश कार्यालयाशी संपर्क साधून तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधितांवर निलंबनाची तत्काळ कारवाई करण्याची मागणीही केली होती. प्रत्यक्षात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यासंदर्भात कोणताच निर्णय अद्याप घेतलेला नव्हता. त्यामुळे मनाने दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांसोबत आणि शरीराने राष्ट्रवादीत असलेल्या संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांचे वर्तन इतर निष्ठावान पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी डोक्याला ताप ठरले होते.

माजी मंत्र्यांनी मारले एका दगडात दोन पक्षी
पक्षविरोधी वर्तन असणाऱ्या तसेच फक्त पदासाठी खुर्ची सांभाळून बसलेल्या काही निष्क्रिय पदाधिकाऱ्यांबद्दल राष्ट्रवादीच्या जळगावमधील बैठकीत माजी मंत्री गुलाबराव देवकर तसेच माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांनी दोघांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तेवढ्यावर न थांबता पक्षामध्ये जिवंतपणा आणण्यासाठी जुन्यांचे राजीमाने घेऊन नव्यांना काम करण्याची संधी देण्याची सूचना देखील दोन्ही माजी मंत्र्यांनी बैठकीच्या ठिकाणी मांडली. विशेष म्हणजे बैठकीस उपस्थित असलेल्या सर्वांनी त्यांच्या सूचनेला लगेचच संमती दिली. आता नवीन कार्यकारीणी निवडीचे अधिकार अर्थातच माजी मंत्री गुलाबराव देवकर तसेच डॉ.सतीश पाटील यांच्याकडेच आले आहेत. पक्षाचा नवा जिल्हाध्यक्ष ओबीसी असावा, असाही मतप्रवाह राष्ट्रवादीच्या बैठकीत होता. मात्र, विधानसभेची आगामी निवडणूक लक्षात घेता संपूर्ण जिल्हा सक्षमपणे सांभाळणारा भक्कम जिल्हाध्यक्ष नेमणे शरदचंद्र पवार राष्ट्रवादीसाठी आता जास्त महत्वाचे आहे. त्यादृष्टीने तात्काळ निर्णय घेऊन नवीन जिल्हा कार्यकारीणी नेमण्याचे आव्हान देखील दोन्ही माजी मंत्र्यांसमोर आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button