शरद पवारांचं ठरलंय….अजित पवार गटाच्या ‘इतक्या’ आमदारांना घेणार वापस !
जळगाव टुडे । लोकसभेच्या निवडणुकीत झालेली वाईट अवस्था लक्षात घेता विधानसभेच्या आगामी निवडणुकीत भाजप हा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घेण्याची शक्यता कमीच आहे. त्यांना सोबत घेतले तरी फक्त २० जागा देण्यात येतील किंवा स्वतंत्र लढण्यास देखील सांगितले जाईल, असा दावा शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या एका नेत्याने केला आहे. दरम्यान, अजित पवार गटाचे १८ ते १९ आमदार आमच्या संपर्कात असले तरी त्यापैकी १० ते १२ आमदारांनाच शरद पवार आता वापस घेतील, असेही विधान त्या नेत्याने केले आहे. ( Ncp Sharadchandra Pawar )
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर अजित पवारांसोबत मोठ्या संख्येने गेलेले आमदार महायुतीत सामील झाले. काहींना सरकारमध्ये मंत्रीपदे देखील मिळाली. राजकीय धुरळा शांत झाल्यावर पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढण्याची वेळ आली तेव्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीने राज्यात पाच ठिकाणी उमेदवार सुद्धा उभे केले. प्रत्यक्षात एकमेव उमेदवार निवडून आल्याने महायुतीच्या नजरेत अजित पवार गटाची किंमत झाली. संघाच्या मुखपत्रातूनही त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत अजित पवार गटाला सोबत ठेवणे भाजपसाठी आणखी नुकसानीचे ठरू शकते, या निष्कर्षापर्यंत संघ परिवार येऊन ठेपल्याचे दिसून आले. अशा या विपरीत परिस्थितीत आपल्या राजकीय भवितव्याविषयी चिंतीत झालेल्या आमदारांनी घरवापसी करण्याच्या दृष्टीने आता शरद पवारांचे दार ठोठावण्यास सुरूवात केल्याचे बोलले जात आहे.
अजित पवार गटाचे कोणीच निवडून येणार नाही
दरम्यान, अजितदादा गटाचे १८-१९ आमदार आमच्या संपर्कात आहेत. पण जे काही आमदार संपर्कात आहे, त्यातील १० ते १२ आमदारांनाच शरद पवार वापस घेतील, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. भाजप अजित पवार गटाला फक्त २० जागा देईल किंवा स्वतंत्र लढण्यासही सांगेल. अजित पवार भाजपसोबत राहिले तर त्यांना २० ते २२ जागा दिल्या जातील आणि जर ते भाजपसोबत नाही राहिले तर मात्र सगळ्या जागांवर त्यांचे आमदार उभे राहतील. पण निवडून मात्र कोणीच येणार नाही, असा दावा देखील आमदार रोहित पवार यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.