शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कात टाकणार…जळगाव जिल्हा कार्यकारीणी तडकाफडकी बरखास्त !
पक्षाच्या मंथन बैठकीत एकमताने निर्णय
जळगाव टुडे । विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्यानंतर विविध राजकीय पक्ष आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीत आपण कुठे कमी पडलो याचेही चिंतन सुरू झाले आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फेही आज गुरूवारी (ता. २७) मंथन बैठकीचे आयोजन जिल्हा कार्यालयात करण्यात आले होते. त्याठिकाणी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला नव्याने उभारी देण्यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण कार्यकारीणी तडकाफडकी बरखास्त करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. ( Ncp Sharadchandra Pawar )
लोकसभा निवडणुकीत जळगाव आणि रावेर मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. विशेषतः रावेरमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीराम पाटील हे पराभूत झाले. त्याअनुषंगाने मंथन बैठकीचे आयोजन पक्षाच्या जळगाव येथील आकाशवाणी चौकातील जिल्हा कार्यालयात गुरूवारी केले होते. त्याठिकाणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ.सतीश पाटील, पक्ष निरीक्षक प्रसेनजीत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्रभैय्या पाटील, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड.रोहिणी खडसे, अल्पसंख्याक आघाडीचे एजाज मलिक, माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, माजी आमदार अरूण पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे, माजी आमदार कैलास पाटील तसेच अतूल पाटील, डॉ. मनोहर पाटील, वाल्मीक पाटील, मंगला पाटील, वंदना चौधरी, ज्योती पावरा आदींसह सर्व तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, माजी मंत्री श्री.देवकर तसेच डॉ.सतीश पाटील, प्रसेनजीत पाटील, अरूणभाई गुजराथी यांनी बैठकीला उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. विधानसभेच्या निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे किमान ०५ आमदार जळगाव जिल्ह्यातून निवडून आणण्यासाठी आतापासूनच कामाला लागण्याचे आवाहन देखील मान्यवरांनी केले.
माजी मंत्र्यांकडून कार्यकारीणी बरखास्तीची सूचना
राष्ट्रवादीच्या मंथन बैठकीत राज्यातील लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल शरद पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची ग्रामीण तसेच महानगर व तालुकास्तरावरील सर्व कार्यकारीणी तातडीने बरखास्त करण्याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला. पक्षाला नव्या जोमाने उभे करण्यासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि डॉ.सतीश पाटील यांनी त्यासंदर्भात सूचना मांडली होती. पक्षाचे निरीक्षक प्रसेनजीत पाटील यांनी दोन्ही माजी मंत्र्यांच्या सूचनेचे स्वागत करून जिल्ह्यातील सर्व कार्यकारीणी तातडीने बरखास्त करत असल्याची घोषणा बैठकीच्या ठिकाणीच केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून आता जिल्ह्यातील सर्वच कार्यकारीणी नव्याने जाहीर होणार आहेत.