एकनाथ खडसेंशी जवळीक असलेल्या राष्ट्रवादीच्या ‘त्या’ पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार ?

जळगाव टुडे । आमदार एकनाथ खडसे यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Sharadchandra Pawar) पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये घरवापसी करण्याची तयारी सध्या चालवली आहे. दरम्यान, खडसेंसोबत भाजपामधून त्यावेळी आलेल्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजुनही राष्ट्रवादीशी फारकत घेतलेली नाही. मात्र, मनाने एकनाथ खडसे यांच्यासोबत आणि शरीराने जळगावच्या राष्ट्रवादीत असलेल्या संबंधित सर्व पदाधिकाऱ्यांचे सध्याचे विरोधाभास निर्माण करणारे वर्तन पक्ष श्रेष्ठींसाठी चांगलेच डोक्याला ताप ठरले आहे. (NCP Sharadchandra Pawar)

जळगाव जिल्ह्यातील रामदेववाडी येथे मातेसह तिच्या चिमुरड्यांचा अपघातात मृत्यू झाल्याच्या प्रकरणामध्ये आजपर्यंत कोणी राजकीय नेत्याने ठोस भूमिका घेतलेली नव्हती. मात्र, आमदार एकनाथ खडसे यांनी अचानक या प्रकरणात उडी घेऊन आता सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांना एक निवेदन देखील दिले आहे. दरम्यान, एकनाथ खडसे हे पोलिस अधीक्षकांना निवेदन देत असताना त्यांच्यासोबत शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे विद्यमान जळगाव महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी तसेच माजी नगरसेवक सुनील माळी हे देखील दिसून आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकनाथ खडसे हे अजुनही शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच आहेत? की त्यांच्यासोबतच्या छायाचित्रातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी सोडली?, असे काही प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.

विषय प्रदेश कार्यालयापर्यंत गेल्याची माहिती
एकनाथ खडसेंनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली असून, त्यांनी रावेर मतदारसंघात भाजपच्या उमेदवार असलेल्या सून रक्षा खडसे यांचा उघडपणे प्रचार केल्याचे सर्वांनी पाहिले आहे. त्यानंतरही शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे जळगावमधील काही जबाबदार पदाधिकारी हे एकनाथ खडसेंना खुले समर्थन देताना दिसत आहेत. हीच बाब जळगावमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही जुन्या पदाधिकाऱ्यांना खटकली आहे. त्यांनी थेट प्रदेश कार्यालयाशी संपर्क साधून त्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची व संबंधितांवर निलंबनाची तत्काळ कारवाई करण्याची मागणी केल्याचीही माहिती मिळाली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आता काय भूमिका घेतात, त्याकडे लक्ष लागले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button