NCP : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे विधानसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांचे १२०० पेक्षा जास्त अर्ज प्राप्त…!
भुसावळ मतदारसंघातून सर्वाधिक अर्ज
NCP : विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपलेली असताना, विविध राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवून घेतले आहेत. प्राप्त माहितीनुसार, १२०० पेक्षा जास्त अर्ज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्राप्त झाले आहेत. विशेषतः राखीव मतदारसंघांसाठी राष्ट्रवादीकडे जास्तीत जास्त अर्ज आले आहेत, ज्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील भुसावळ मतदारसंघाचा देखील समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.
NCP: Sharad Chandra Pawar NCP has received 1200 applications from candidates willing to contest the assembly elections…!
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला आगामी विधानसभेच्या निवडणुकीत ८५ ते ९० जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या जागांसाठी पक्षाकडे आज अखेर १३५० इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यभरातील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारांची मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. विशेषतः, राखीव जागांसाठी जास्त अर्ज आले असून, मोहोळ तसेच फलटण, दिंडोरी, उदगीर, भुसावळ, मेहकर, मूर्तिजापुर, उमरेड, शहापूर, अंबरनाथ, आणि माळशिरस विधानसभा मतदारसंघांमधील इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बंडखोरी करणार नसल्याचे १०० रुपयांच्या बाँड पेपरवर प्रतिज्ञापत्र
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील गटासाठी एवढ्या मोठ्या संख्येने अर्ज दाखल होणे निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचे मानले जात आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते व युतीचे इतर घटक या अर्जांवर विचार करीत असून, अंतिम उमेदवारांची निवड करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला विधानसभेतून उमेदवारी मिळावी, या आशेने अर्ज केलेल्या काही इच्छुक उमेदवारांनी अनोखा मार्ग स्वीकारला आहे. उमेदवारी मिळाली नाही तरी आपण अपक्ष म्हणून लढणार नसल्याचे संबंधितांनी थेट शंभर रुपयांच्या बाँड पेपरवर प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे. या प्रतिज्ञापत्रात इच्छुक उमेदवारांनी स्पष्टपणे लिहिले आहे की, राज्यातील २८८ जागांपैकी कोणत्याही जागेसाठी आपला विचार झाला नाही तरीही आपण बंडखोरी करणार नाही. अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार नाही तसेच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटालाच पाठिंबा देऊ, असा शब्द संबंधित इच्छुक उमेदवारांनी दिला आहे.