काका-पुतण्याच्या लढाईत राहुल नार्वेकरांचा शरद पवारांना ‘दे धक्का’
NCP Result : काका आणि पुतण्याच्या लढाईत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी गुरुवारी (ता. 15) अजित पवार यांचा गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल देऊन शरद पवारांना जोरदार धक्का दिला. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आजच्या या निकालाकडे लागले होते.
41 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र देऊन आपला गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा अजित पवार गटाने केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला खरी राष्ट्रवादी काँग्रेस घोषित सुद्धा केले होते. तसेच शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव बहाल केले होते. दरम्यान, अजित पवार यांचा गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तसेच अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाचे आमदार पात्र आहेत, असाही महत्त्वपूर्ण निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणात आलेल्या दोन्ही गटाच्या सर्व याचिका देखील नार्वेकर यांनी फेटाळून लावल्या. अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकत नाही. शरद पवार गटाने लोकप्रतिनिधी सभागृहाची कागदपत्रे दिलेली नाहीत. अध्यक्षपदाची निवड पक्षाच्या घटनेनुसार झालेली नाही. अशा स्थितीत आमदारांच्या संख्याबळाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला, असेही त्यांनी स्पष्ट केले.