मोठी बातमी….अजित पवार गटाचे 19 आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत परतणार !
जळगाव टुडे | लोकसभेच्या निवडणुकीत मोठा दणका बसल्यानंतर अजित पवार गटाचे चांगलेच होश उडाले आहेत. लोकसभेत इतकी वाईट स्थिती झाली म्हटल्यावर विधानसभेच्या निवडणुकीत आपले काही खरे नाही, याची जाणीव झालेले तब्बल 18ते 19 आमदार त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत परतण्याचा विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित सर्व आमदारांना आता शरद पवार स्वीकारतात किंवा नाही, त्याविषयी तर्क वितर्क लढवले जात आहेत. ( NCP Maharashtra )
लोकसभा निवडणुकीत 10 पैकी 08 खासदार निवडून आल्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा दबदबा निर्माण झालेला आहे. विधानसभेच्या निवडणुकीतही अशीच दमदार कामगिरी करण्यासाठी त्यामुळे राष्ट्रवादीत उत्साह संचारला आहे. अजित पवार गटाचे बरेच आमदार त्यामुळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याच्या विचारात आहेत. संबंधित सर्व आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी देखील केला आहे. मूळ राष्ट्रवादीत घरवापसी करण्याच्या विचारात असलेल्या त्या आमदारांना परत घ्यायचे किंवा नाही, याचा निर्णय अर्थातच खुद्द शरद पवार हे घेणार आहेत. दरम्यान, रोहित पवारांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. सध्याच्या घडीला शरद पवारांच्या सर्वात जवळ रोहित पवार हेच आहेत. त्यामुळे त्यांनी अजित पवार गटाच्या आमदारांच्या घरवापसी विषयी केलेल्या विधानाला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. सगळीकडे खळबळ सुद्धा उडाली आहे.
शरद पवार राष्ट्रवादीची 30 उमेदवारांची यादी तयार
दरम्यान, विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्यानंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस तयारी लागली आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी जवळपास 30 आमदारांची यादी त्यांच्याकडून फायनल सुद्धा झाली आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या ज्या कोणी आमदारांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीत परत येण्याची इच्छा आहे त्यांनी येत्या 15 दिवसात काय तो निर्णय घ्यावा, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. तसेच घरवापसी करणाऱ्या आमदारांच्या बाबतीत शरद पवार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे दोघेच निर्णय घेतील, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे.