NCP : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ‘घड्याळ’ चिन्ह गोठणार ? शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका…!
NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ निवडणूक चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालय मागील काही दिवसांपासून सुरू आहे. तशात विधानसभा निवडणुकीपूर्वी घड्याळ हे चिन्ह गोठवा, अशी मागणी शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून केली आहे. दोन्ही पवार गटातील वाद त्यामुळे आणखी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
NCP: Ajit Pawar group’s watch symbol will freeze? Petition of Sharad Pawar group filed in Supreme Court…!
शरद पवार गटाने अजित पवार यांना मिळालेल्या घड्याळ चिन्हाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आता महत्त्वपूर्ण वळणावर आहे. शरद पवार गटाने न्यायालयाकडे घड्याळ चिन्हाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केली आहे, तसेच विधानसभा निवडणुकांपर्यंत घड्याळ चिन्हाला गोठवण्याची मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या शरद पवार गटाला बऱ्याच मतदारसंघांमध्ये पिपाणी या समान चिन्हामुळे गोंधळाचा फटका बसला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह तात्पुरते गोठवले देखील आहे. दुसरीकडे अजित पवार यांना घड्याळ चिन्हाचा फायदा होत असल्याचे दिसत आहे. या सगळ्या घडामोडींमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे, जो आगामी विधानसभेच्या निवडणुकांवर मोठा प्रभाव टाकू शकतो.
दरम्यान, विधानसभेची निवडणूक तोंडावर असतानाही सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ निवडणूक चिन्हाच्या वादावर आधी दाखल झालेल्या याचिकांवर अद्याप निर्णय दिलेला नाही. त्याविषयी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चाळीसगाव येथे जाहीर नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रेचे आगमन शनिवारी जळगाव जिल्ह्यात झाले, त्याप्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी महायुतीवर निशाणा साधला.