राष्ट्रवादी शरद पवारांची की अजित पवारांची ? सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी ‘या’ दिवशी
जळगाव टुडे । राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) शरद पवार यांचा की त्यांचा पुतण्या अजित पवारांचा, या बाबतची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी मंगळवारी (ता.14) ठेवण्यात आली होती. न्या. विश्वनाथन आणि न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर 44 व्या क्रमांकावर हे प्रकरण होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ या चिन्हाबाबत महत्वाचा निर्णय त्यात होणे अपेक्षित देखील होते. त्यासंदर्भात मोठी अपडेट आता समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व चिन्ह अजित पवार गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. 19 मार्चला त्यावरील सुनावणीदरम्यान कोर्टाने अजित पवारांना नोटीस जारी करुन चार आठवड्यांत या याचिकेबाबत उत्तर मागवले होते. त्यानंतर या उत्तराबाबत शरद पवारांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र, सदरच्या कालावधीत अजित पवारांचे उत्तर व शरद पवारांचे त्यावरील म्हणणे सादर झालेले नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला सुनावणी दोन महिने पुढे ढकलावी लागली आहे.
16 जुलैला पुढील सुनावणी सुरू होणार असून, त्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ या चिन्हाबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. 18 मे ते 07 जुलै या काळात न्यायालयास उन्हाळी सुटी असल्याने आता त्यानंतरची तारीख देण्यात आली आहे.