राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गटाला ‘तुतारीवाला माणूस’ हे नवे निवडणूक चिन्ह

Nationlist Congress Party : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ या गटाला आता ‘तुतारीवाला माणूस’ हे नवे चिन्ह निवडणूक आयोगाकडून मिळाले आहे. पुढील आदेश येईपर्यंत, विशेषतः आगामी काळातील निवडणुकीत शरद पवार गटाला ‘तुतारी’ हे चिन्ह वापरण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. त्यामुळे आता ‘तुतारी’ हे चिन्ह शरद पवार गट मतदारांपर्यंत कसे पोहोचविते, त्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

वटवृक्षासह अन्य दोन चिन्हांचा पर्याय शरद पवार गटाने मागितला होता. पण निवडणूक आयोगाने तुतारीवाला माणूस हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला बहाल केले. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ असे नाव त्यांच्या पक्षाला दिले होते. त्यानंतर आता पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात आले आहे.

दरम्यान, “महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्याने ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणे ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!” असे ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ पक्षाच्या अधिकृत पेजवर नमूद केले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button